मराठवाड्यातील शेतकर्यांना तातडीचे साहाय्य सर्वतोपरी पोचवण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश !
मुंबई – मराठवाड्यात अतीवृष्टीमुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली; मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकर्यांच्या पाठीशी आहेत. शेतकर्यांना सर्वतोपरी साहाय्य करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून अतीवृष्टी होत आहे. त्याचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्र्यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाकडून घेतला. या वेळी ते बोलत होते.
‘सध्या बचाव आणि तातडीच्या साहाय्यकार्यास वेग द्यावा. महसूल विभाग, कृषी विभाग यांमुळे झालेल्या हानीचे पंचनामे तातडीने चालू करावेत. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचीही हानी झाली आहे. पिके वाहून गेली आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीने सर्वतोपरी साहाय्य पोचवावे’, असे निर्देश त्यांनी दिले.
‘पूरपरिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोचू शकले नाहीत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे, याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोचवा, तसेच नवीन दिनांकांविषयी माहिती द्या’, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे.
या वेळी एन्.डी्.आर्.एफ्.चे सैनिक आणि स्थानिक पोलीस यांनी धाराशिव, लातूर, संभाजीनगर, यवतमाळ येथील १०० जणांना वाचवले, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.