श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या १०३ व्या पुण्यतिथी उत्सवास भावपूर्ण वातावरणात प्रारंभ !
नवबाग-कागवाड (जिल्हा – बेळगाव), २९ सप्टेंबर (वार्ता.) – घोर कलियुगात उद्धरून जाण्यासाठी भगवद्भक्ती आणि नामस्मरण यांशिवाय अन्य कुठलाही पर्याय नाही, हे सामान्य जिवांना उलगडून सांगणारे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे पट्टशिष्य-शिष्योत्तम श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या १०३ व्या पुण्यतिथी उत्सवास श्री ब्रह्मानंद महाराज संस्थान, नवबाग, कागवाड (जिल्हा बेळगाव) येथे २९ सप्टेंबरला भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. हा उत्सव ६ ऑक्टोबरपर्यंत होत आहे. उत्सव काळात २८ सप्टेंबरला समाधी मंदिर येथे श्री ब्रह्मानंद महाराज संस्थानचे अध्यक्ष अधिवक्ता समीर पटवर्धन आणि त्यांच्या पत्नी सौ. सुचित्रा पटवर्धन यांच्या हस्ते कोठीपूजन करण्यात आले.
‘उत्सव काळात ३ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ९ वाजता श्री रामनाम तारक होम केला जाईल आणि ६ ऑक्टोबर या दिवशी सकाळी १० वाजता श्रींचा ‘निर्याण काल’ साजरा केला जाणार आहे. प्रतिदिन काकडआरती, रुद्र, आरती, महाप्रसाद असे नैमित्तिक कार्यक्रम होत आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव शासकीय आदेशांचे पालन करून करण्यात येत आहे’, अशी माहिती अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी दिली.