सनातनचे संत पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) यांच्या छायाचित्रांच्या संदर्भात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

‘१७.९.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सनातनचे बालकसंत पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संदर्भातील लेख आला होता. त्यामध्ये त्यांची २ छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली होती. पहिले छायाचित्र पू. वामन डोळे मिटून नामजप करत असलेले, तर दुसरे छायाचित्र ते सोवळे-उपरणे घालून चालत येत असतांनाचे होते. ‘या दोन्ही छायाचित्रांकडे पाहून काय अनुभूती येतात ?’, हे लिहून देण्यास सांगण्यात आले होते. याविषयी मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

१. पू. वामन डोळे मिटून नामजप करत असलेले छायाचित्र

अ. पू. वामन यांना पाहून माझे मन शांत झाले.

आ. त्यांच्याकडून थंडावा येत असल्याचे जाणवले. थंडावा म्हणजे वायुतत्त्व !

इ. आरंभी माझी चंद्रनाडी कार्यरत होती. पू. वामन यांना पाहिल्यावर मला माझ्या सहस्रारचक्रावर स्पंदने जाणवली आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. यावरून ते ‘समष्टी संत’ (समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी कार्यरत असलेले संत) असल्याचे जाणवले.

ई. पू. वामन यांनी डोळे मिटलेले असतांनाही त्यांच्या पापण्यांची सूक्ष्मातून थोडी हालचाल होत असल्याचे जाणवले. हे त्यांच्याकडून प्रक्षेपित होत असलेल्या वायुतत्त्वामुळे होत होते.

उ. त्यांच्याकडे पहात राहिल्यावर मला माझ्या अस्तित्वाचा लय झाल्याचे जाणवले. पू. वामन दुसर्‍याला आपल्यात सामावून घेतात, म्हणजे आपलेसे करतात. त्यामुळे त्यांना पाहिल्यावर आपले अस्तित्व रहात नाही.

ऊ. त्यांना पाहून ‘ते तेथे आहेतही आणि नाहीतही’, असे जाणवले. त्यामुळे ‘सगुण-निर्गुण नाही भेदाभेद’ याची मला प्रचीती आली.

ए. त्यांना पाहून माझी ‘जागृत ध्यानावस्था’ यासारखी स्थिती झाली.

२. पू. वामन सोवळे-उपरणे घालून चालत येत असतांनाचे छायाचित्र

अ. पू. वामन यांना पाहून मला पुष्कळ आनंद झाला.

आ. पू. वामन यांचे हे छायाचित्र पाहून मला माझ्या सहस्रारचक्रावर स्पंदने जाणवली आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

. ते पुष्कळ भव्य-दिव्य वाटले.

ई. मी त्यांच्या डोळ्यांकडे आकर्षित झालो. त्यांचे डोळे बोलके आहेत. त्यांच्या डोळ्यांकडेच आपले लक्ष वेधले जाते आणि आपले अस्तित्व नाहीसे होते.

उ. पू. वामन यांच्या या छायाचित्राकडे बघूनही मला माझी ‘जागृत ध्यानावस्था’ अनुभवायला मिळाली.

ऊ. १०.९.२०१९ या दिवशी त्यांची आध्यात्मिक पातळी ७१ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले होते. आता (सप्टेंबर २०२१ मध्ये) ती वाढून ७३ टक्के झाली असल्याचे जाणवले. त्यांची ही उन्नती बघून ते लहान वयातच ‘सद्गुरुपदी’ (८० टक्के पातळीला) विराजमान होतील’, असे वाटले.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पी.एच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.९.२०२१)