१ ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळी १० रुपयांना देण्याचा शासनाचा निर्णय !
मुंबई, २९ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोनाच्या कालावधीत गरीब आणि निराधार नागरिकांपैकी कुणी उपाशी राहू नये, यासाठी शासनाने शिवभोजन थाळी विनामूल्य देण्याचे घोषित केले होते. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन याची समयमर्यादा ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती; मात्र सध्या राज्यातील कोरोनाचा संसर्ग न्यून होत असल्यामुळे शासनाने शिवभोजन थाळी पुन्हा १० रुपयांना देण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच कोरोनाच्या कालावधीत प्रत्येक केंद्राची शिवथाळी देण्याची मर्यादा दीडपट वाढवण्यात आली होती. तीही पूर्ववत् करण्यात आली आहे. शिवभोजन थाळीचे पार्सल देण्याची सुविधाही रहित केली आहे. १ ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू होणार आहे.