महिला उत्कर्ष आस्थापनाचे संचालक सईद खान यांना अटक !
|
वाशिम – वाशिम-यवतमाळ येथील शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या ‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’मध्ये पालट करून त्याचे ‘महिला उत्कर्ष आस्थापना’मध्ये रूपांतर करण्यात आले. या प्रकरणी आस्थापनाचे संचालक सईद खान यांची काही दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) चौकशी केली होती. आता ‘ईडी’ने २७ सप्टेंबरच्या रात्री सईद खान यांना अटक केली आहे; मात्र ‘ही अटक अनधिकृत आहे’, असा दावा खान यांचे अधिवक्ता इंद्रपाल सिंह यांनी केला आहे.
खान यांनी ‘ईडी’कडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन केले, तसेच अन्वेषणातही सहकार्य केले; परंतु तरीही त्यांना अटक करण्यात आल्याविषयी अधिवक्ता सिंह यांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे. ज्या आस्थापनाच्या चौकशीसाठी खान यांना अटक करण्यात आली आहे, त्याच आस्थापनामध्ये गवळी या संचालक होत्या. त्यामुळे आगामी काळामध्ये गवळी यांच्याही चौकशीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजप नेत्यांचा आरोप !
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ऑगस्ट मासात भावना गवळी यांच्यावर ‘१०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे’, असा आरोप केला होता. त्यानंतर ‘ईडी’ने गवळी यांच्या २ निकटवर्तीय सहकार्यांना ‘ईडी’समोर उपस्थित रहाण्याची नोटीस पाठवली. आर्थिक अपव्यवहारांप्रकरणी ‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’शी संबंधित २ व्यक्तींना ‘ईडी’ने समन्स पाठवले होते. दोघांनाही ‘ईडी’च्या अन्वेषणासाठी अधिकार्यांसमोर उपस्थित रहाण्याविषयी समन्समध्ये म्हटले होते; मात्र दोन्ही व्यक्तींनी खासगी कारण देत ‘ईडी’समोर उपस्थित रहाण्यासाठी १५ दिवसांचा अवधी द्यावा’, अशी मागणी ६ सप्टेंबर या दिवशी केली होती.
काय आहे प्रकरण ?
भावना गवळी यांनी ५५ कोटी रुपयांचा ‘बालाजी पार्टिकल बोर्ड’ हा कारखाना २५ लाख रुपयांत घेतला आहे. ‘७ जुलै २०१९ या दिवशी रिसोड येथील जनशिक्षण संस्था आणि महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’च्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरून नेले आहेत’, अशी तक्रार गवळी यांनी १२ मे २०२० या दिवशी पोलीस ठाण्यात केली होती. तेव्हा ‘१० मास विलंबाने तक्रार देण्याचे कारण काय ? त्या कार्यालयात ७ कोटी कुठून आले ?’, अशी विचारणा सोमय्या यांनी केली होती. या संदर्भात त्यांनी केंद्रीय सहकार मंत्री, सीबीआय, ईडी, स्टेट बँक, नॅशनल को-ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि अन्य ठिकाणी तक्रारी प्रविष्ट केल्या. त्यानंतर मुंबई येथील ‘ईडी’च्या पथकांनी ३० ऑगस्ट या दिवशी गवळी यांच्या रिसोड अर्बन सहकारी पतसंस्था, आयुर्वेद महाविद्यालय, भावना पब्लिक स्कूल, डी.फॉर्म. महाविद्यालय, पुंडलिकराव गवळी महाविद्यालय आणि शिरपूर जैन या संस्थांमध्ये धाडी टाकल्या होत्या.