धर्मांतर जिहाद !
संपादकीय
|
गेल्या काही मासांपासून हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या षड्यंत्राचे धागेदोरे उत्तर भारतात मिळत होते. जून २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात महंमद उमर गौतम आणि मुफ्ती काझी जहांगीर आलम या दोघांना देहलीच्या जामियानगरमधून अटक केल्यानंतर त्यांनी १ सहस्र लोकांचे विशेषत: हिंदूंचे धर्मांतर केल्याचे समोर आले. त्यातच त्यांचा म्होरक्या मौलाना (इस्लामी अभ्यासक) कलीम सिद्दीकी याला गेल्या आठवड्यात उत्तरप्रदेशच्या मेरठमधून अटक करण्यात आली. सिद्दीकीला या षड्यंत्राला खतपाणी घालण्यासाठी हवालाच्या माध्यमातून ३ कोटी रुपये मिळाल्याचे समोर आले. आता या षड्यंत्राचे धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत पोचले असून येथील डॉ. आतिफ उपाख्य कुणाल चौधरी याला अटक करण्यात आली आहे. ‘ए.एन्.आय.’ने दिलेल्या वृत्तानुसार आतिफ हा रशियामधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक परीक्षा अनुत्तीर्ण झाला. त्यामुळे त्याने नाशिकमध्ये अवैधपणे वैद्यकीय व्यवसाय चालू केला आणि त्याच्याकडे येणार्या अन्य धर्मीय रुग्णांना आमीष दाखवून त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर करणे चालू केले. यासाठी त्याला विदेशातून तब्बल २० कोटी रुपये मिळाले. आतिफ हा मौलाना सिद्दीकीच्या संपर्कातही होता. यातून हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी रचलेल्या धर्मांतर जिहाद या कटाचे आंतरराष्ट्रीय स्वरूप लक्षात येत आहे.
डोक्यात भिनवलेला ‘जिहाद’ !
‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (जागतिक स्तरावरील हिंदुत्वाचे उच्चाटन) करण्यासाठी काही दिवसांपूर्वी आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेला साम्यवादी, ‘इंडोलॉजिस्ट्स’ (भारतीय धर्म, इतिहास, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करणारे तज्ञ), उदारमतवादी विद्वानांच्या रूपांतील ‘वैचारिक आतंकवाद्यां’नी हिंदुत्वाच्या नावावर कुठाराघात करून हिंदूंचा ‘बुद्धीभेद’ करण्याचा प्रयत्न चालवला. दुसरीकडे आता चालू असलेल्या अटकसत्रांतून हिंदूंचे धर्मांतर करून त्यांचा ‘धर्मभेद’ करण्यासाठी धर्मांध प्रयत्नशील आहेत, हे लक्षात घेऊन सतर्क होण्याची आवश्यकता आहे. धर्मांतराच्या या आंतरराष्ट्रीय कटाची पाळेमुळे खणून काढायला हवीत. या षड्यंत्राचे धागेदोरे हाती लागत असतांनाच पुन्हा एकदा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहेत. मुसलमानांना मुख्य प्रवाहात घेण्याचा प्रयत्न करण्याच्या नावाखाली निधर्मी भारताने राज्यघटनेतील नियमांना तिलांजली देत सच्चर आयोगासारख्या एकांगी अहवालाच्या शिफारशींना लागू करण्याचा प्रयत्न चालवला होता. म्हणे ‘मुसलमानांना आधुनिक शिक्षण दिल्यास ते कट्टरतावादाकडे वळणार नाहीत’, असा हास्यास्पद युक्तीवाद करून त्यांच्यावर सोयीसुविधांची खैरात करण्यात आली. कुणी उच्च विद्याविभूषित धर्मांध असोत कि उच्च शिक्षण प्राप्त केलेले ‘फॉरेन रिटर्न्ड’ (विदेशातून शिक्षण घेऊन परत आलेले) धर्मांध, ते त्यांच्या पंथाची शिकवण तंतोतंत आचरणात आणण्यासाठी कटीबद्ध असतात, याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा करण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या असलेल्या एका डॉक्टरवर तो आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप झाल्याने तेथे खळबळ उडाली होती. आधी इस्लामिक स्टेट आणि आता तालिबानशी हातमिळवणी करण्यासाठी अफगाणिस्तानचा रस्ता पकडणारे केरळमधील काही धर्मांध हे उच्चशिक्षित आहेत. वर्ष २०१४ मध्ये इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीच्या प्रसारासाठी ट्विटर आदी सामाजिक माध्यमांचा वापर केल्याने मेहदी मसरूर बिस्वास याला अटक करण्यात आली. मेहदी मसरूर बिस्वास हा बेंगळुरूच्या एका बहुराष्ट्रीय आस्थापनात लक्षावधी रुपये कमावणारा अभियंता म्हणून कार्यरत होता. या सर्वांत लक्षात घेतले पाहिजे की, लहानपणापासून धर्मांधांच्या डोक्यात भिनवण्यात आलेली जिहादची शिकवण ‘अनलर्न’ करणे (विसरणे) अशक्य कोटीतील गोष्ट आहे. धर्मांधांना तुम्ही जगातील कोणतेही अगदी ‘रॉकेट सायन्स’सारखे प्रगल्भ शिक्षण दिले, तरी त्यांची स्वपंथाप्रतीची मानवविघातक निष्ठा कधी ढळत नाही, ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे.
हिंदु ‘तालिबानी’ ?
याचे आणखी एक ज्वलंत उदाहरण म्हणजे लक्ष्मणपुरी येथे कार्यरत असलेले प्रशासकीय अधिकारी इफ्तिखारुद्दीन यांचे ! कानपूरमध्ये सेवारत असतांनाचे त्यांचे काही व्हिडिओज आता ‘व्हायरल’ (प्रसारित) झाले आहेत. त्यांत ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी काही मुसलमान बांधवांना काफिरांचे धर्मांतर करण्याची आवश्यकता यांविषयी माहिती समजावून सांगत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओजची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न चालू असून ‘यांत तथ्य आढळले, तर आवश्यक कारवाई केली जाईल’, अशी सावधपणाची भूमिका उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी घेतली आहे. या प्रकरणाचे सत्य लवकर बाहेर येईल; परंतु इफ्तिखारुद्दीन यांच्या ठिकाणी एखादा हिंदु प्रशासकीय अधिकारी एखाद्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यक्रमात केवळ सहभागी झाल्याचे समोर आले असते, तरी एव्हाना संपूर्ण निधर्मी भारताने ‘देशाचे भगवेकरण होत आहे’, ‘हिंदु तालिबानी’ अशा प्रकारे नानाविध आरोप करून हिंदूंना वेठीस धरले असते.
या सर्व घटनांच्या केंद्रस्थानी ‘धर्मांतर जिहाद म्हणजे हिंदूंचे येनकेन प्रकारेण धर्मांतर घडवून आणणे’, हे समान सूत्र आहे. यावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर धर्मांतरविरोधी कायदा आणलाच पाहिजे. तसेच एखाद्या रेषेला हात न लावता ती लहान करण्यासाठी तिच्या शेजारी एक मोठी रेष ओढावी लागते, या नियमानुसार हिंदूंना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे. त्याने कोणताच हिंदू धर्मांतराला बळी पडणार नाही आणि धर्मांध अथवा ख्रिस्ती यांनी तसे प्रयत्न केलेच, तरी त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास तो सक्षम बनेल. हिंदूंचे पर्यायाने भारताचे हित साधण्यासाठी आवश्यक राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी ते दृग्गोचर होणे अशक्य नसले, तरी कठीण आहे. त्यासाठी हिंदु धर्माला राजाश्रय देऊन हिंदूंच्या सुरक्षिततेची आणि सर्वंकष कल्याणाची हमी देणार्या हिंदु राष्ट्राला पर्याय नाही, हेच खरे !