गोव्यात शाळा प्रत्यक्ष आणि ‘ऑनलाईन’ अशा दोन्ही स्वरूपांत चालू करण्याची वैद्यकीय तज्ञ समितीची शिफारस
पणजी, २८ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यात कोरोनाबाधित नवीन रुग्ण सापडण्याची संख्या घटल्याने आणि पर्यटन क्षेत्राशी निगडित उद्योग चालू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळाही चालू होण्याच्या स्थितीत आहेत. कोरोना महामारीच्या अनुषंगाने शासनाने नेमलेल्या तज्ञ वैद्यकीय समितीने राज्यात शाळा प्रत्यक्ष आणि ‘ऑनलाईन’ अशा दोन्ही स्वरूपांत (हायब्रीड मोड) चालू करण्याची शिफारस राज्यशासनाला केली आहे. वैद्यकीय तज्ञ समितीची १२ वी बैठक गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस्.एम्. बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत शासनाला ही शिफारस करण्यात आली.
वैद्यकीय तज्ञ समितीने शाळा चालू करण्यासंबंधी पुढील शिफारसी शासनाला केल्या आहेत.
१. राज्यात शाळा प्रत्यक्ष आणि ‘ऑनलाईन’ अशा दोन्ही स्वरूपांत (हायब्रीड मोड) चालू कराव्या.
२. प्रारंभी ९ वी, १० वी, ११ वी आणि १२ वी या इयत्तांचे वर्ग चालू करावेत आणि कोरोना महामारीसंबंधीचा आढावा प्रत्येक १५ दिवसांनी घ्यावा.
३. शाळेच्या कर्मचारी वर्गाने शाळा चालू होण्याच्या १५ दिवस आधीच कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या असाव्या अन्यथा संबंधित कर्मचार्याला प्रत्येक आठवड्याला ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचा अहवाल (कोरोनाचा संसर्ग झालेला नाही यासंबंधीचा चाचणी अहवाल) शाळेच्या व्यवस्थापनला द्यावा लागेल.
४. पालक आणि घरातील इतर व्यक्ती यांनी शाळा चालू होण्याच्या किमान एक मास आधी कोरोना प्रतिबंधक लसीची मात्रा घेतलेली असली पाहिजे.
५. पाल्यांची शाळेत ने-आण करणार्या वाहनचालकाने कोरोना प्रतिबंधक लसीची मात्रा घेतली आहे कि नाही, याची पडताळणी संबंधित पालकांना करावी लागणार आहे.
६. ज्या पालकांना ‘आपल्या पाल्याला शाळेत पाठवायला नको’, असे वाटत असेल, ते पालक पाल्याला घरी ‘ऑनलाईन’ शिक्षण देऊ शकतात.
७. शाळा प्रत्यक्ष आणि ‘ऑनलाईन’ अशा दोन्ही स्वरूपांत (हायब्रीड मोड) चालू ठेवायची कि केवळ ‘ऑनलाईन’ स्वरूपात चालू ठेवायची याविषयीचा निर्णय संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने घ्यायचा आहे. ‘हायब्रीड मोड’ मध्ये शाळा चालू ठेवल्यास विद्यार्थ्यांना सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाचे पालन करण्यास सोपे जाणार आहे.
८. कोरोना महामारीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांनुसार एखाद्या मुलामध्ये तापाची लक्षणे दिसत आहेत; पण तो कोरोनाबाधित नाही असे असले, तरी त्याला १० दिवस घरी थांबण्यास सांगण्यात येणार आहे.
वैद्यकीय तज्ञ समितीने शाळा चालू करण्याचा प्रत्यक्ष दिनांक अजूनही निश्चित केलेला नाही आणि शासन वैद्यकीय तज्ञ समितीच्या शिफारसींचा अभ्यास करून नंतर शाळा चालू करण्याचा प्रत्यक्ष दिनांक निश्चित करणार आहे. ‘इंडियन ॲकेडमी ऑफ पॅडियाट्रीक्स’च्या गोवा विभागाचे डॉ. धनेश वळवईकर म्हणाले, ‘‘शाळा चालू करण्यावरून अनेकांच्या मनात प्रश्न किंवा शंका असेल; परंतु शाळा बंद असल्याने मुलांचा बाहेरच्या जगाशी संबंध तुटत चालला आहे. शाळेचे प्रत्यक्ष वर्ग खूप कालावधीसाठी बंद ठेवल्यास पुढे मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.’’