वर्ष २०२० मध्ये पितृपक्षाच्या काळात रामनाथी आश्रमात श्राद्धकर्म करतांना मुंबई येथील साधक श्री. बळवंत पाठक यांना आलेल्या अनुभूती
‘९.९.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृृपेने मला सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात श्राद्धविधी करण्याची संधी मिळाली.
१. श्राद्धविधी चालू असतांना
१ अ. श्राद्धविधी चालू झाल्यावर सूक्ष्मातून आईच्या आई-वडिलांचे लिंगदेह निस्तेज अवस्थेत दिसणे आणि देव-ब्राह्मण अन् पितृ-ब्राह्मण यांना अन्न समर्पण केल्यावर ‘लिंगदेहांना शक्ती मिळून त्यांच्यात चेतना जागृत झाली आहे’, असे जाणवणे : ‘आश्रमात श्राद्धकर्म चालू झाल्यावर मला माझ्या मामाचे घर दिसले. त्या घरात माझ्या आजीने (आईच्या आईने) आत्महत्या केली होती. मला तिचा लिंगदेह निस्तेज अवस्थेत दिसत होता. घराच्या बाहेरील जागेत आजोबांचा (आईच्या वडिलांचा) लिंगदेहही निस्तेज अवस्थेत दिसत होता. देवपूजा आणि पितरांची पूजा चालू झाल्यावर ‘त्या लिंगदेहांना शक्ती मिळत आहे’, असे मला जाणवले. ‘आजीचा लिंगदेह तिने केलेल्या कृतीसाठी ईश्वरचरणी क्षमा मागत आहे आणि यातनांतून सोडवण्याची विनवणी करत आहे’, असे मला जाणवले. देव-ब्राह्मण (देवस्थानी मानलेले ब्राह्मण) आणि पितृ-ब्राह्मण (पितृस्थानी मानलेले ब्राह्मण) यांना अन्न समर्पण केल्यावर ‘लिंगदेहांना शक्ती मिळून निस्तेज लिंगदेहांत चेतना जागृत झाली’, असे मला दिसले. ‘त्या दोन्ही लिंगदेहांना पिंडदानाच्या विधीच्या वेळी अन्नाच्या माध्यमातून आवश्यक ती ऊर्जा मिळत आहे’, असे मला जाणवले.
१ आ. कुलदेवतेचे स्मरण केल्यावर ‘कुलदेवता आईच्या आई-वडिलांच्या लिंगदेहांना आशीर्वाद देत आहे आणि त्यांना आध्यात्मिक बळ देत आहे’, असे दिसणे : आमची आणि आईच्या माहेरच्या कुळाची कुलदेवता ‘श्री सावित्रीमाता’ आहे. माझ्या मामांच्या घराशेजारी कुलदेव आणि कुलदेवी यांचे मंदिर आहे. विधी चालू असतांना पुरोहितांनी कुलदेवतेचे स्मरण करायला सांगितले. तेव्हा ‘आईच्या आई-वडिलांच्या लिंगदेहांना कुलदेवता आशीर्वाद देत आहे. ‘श्री सावित्रीमाता’ त्यांना यातनांतून मुक्ती देत असून आध्यात्मिक बळ देत आहे’, असे मला दिसले.
१ इ. ‘श्राद्धविधीद्वारे परात्पर गुरु डॉक्टर सर्वत्रच्या साधकांच्या पूर्वजांना गती देत आहेत आणि सर्व साधकांचे पूर्वज पुढच्या टप्प्याला जात आहेत’, असे जाणवणे : श्राद्धविधी चालू असतांना ‘मी केवळ निमित्तमात्र आहे’, याची मला जाणीव झाली. ‘या विधीद्वारे परात्पर गुरु डॉक्टर सर्वत्रच्या साधकांच्या पूर्वजांना गती देत आहेत आणि सर्व साधकांचे पूर्वज पुढच्या टप्प्याला जात आहेत’, असे मला जाणवले. परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेमुळे मला हा विधी वैकुंठलोकात (रामनाथी आश्रमात) करण्याची संधी मिळाली. श्राद्धविधी चालू असतांना दिसलेल्या दृश्यांच्या माध्यमातून ‘परात्पर गुरुदेवांची साधकांवर किती कृपा आहे’, हे मला अनुभवायला मिळाले. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.
२. श्राद्धविधीनंतर भावाने व्यवसायासाठी यंत्र खरेदी करणे आणि मामाने नामजपाला आरंभ करणे
‘आमच्या कुटुंबियांना आणि मामाला पूर्वजांचा त्रास आहे. त्यामुळे अनेक आध्यात्मिक त्रास होत आहेत’, असे मला जाणवत होते. माझ्या भावालाही पुष्कळ आध्यात्मिक त्रास आहे. श्राद्धविधी झाल्यावर माझ्या भावाने व्यवसायासाठी एक यंत्र खरेदी केले, तसेच माझ्या मामाने नामजपाला आरंभ केला.’
– श्री. बळवंत पाठक, मुंबई (२०.९.२०२०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |