‘मान्यवर’वर बहिष्कार घाला !
विविध माध्यमांतून होणारा हिंदु धर्माचा अवमान रोखण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन हाच एकमेव पर्याय ! – संपादक
‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ या आस्थापनाने नुकतेच ‘मान्यवर’ या प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँडचे एक विज्ञापन प्रसारित केले आहे. त्यामध्ये ‘कन्यादान’ चुकीचे असून ‘आता कन्यादान नव्हे, तर कन्यामान’, अशा प्रकारे परंपरा पालटण्याचा संदेश दिला. त्यामुळे हिंदूंवर पुन्हा एकदा आघात होऊन त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. सामाजिक माध्यमांतून अशा प्रकारे हिंदूच्या भावना दुखावणे नित्याचेच झाले आहे; परंतु या वेळी ‘अभिनेत्री आलिया भट्ट आणि ‘मान्यवर’ आस्थापन यांवर बहिष्कार टाका’, अशी मागणीही मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
हिंदुद्रोही आस्थापने वारंवार हिंदूंच्या प्रथा आणि परंपरा यांना लक्ष्य करून हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व अल्प करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. हेच यावरून सिद्ध होते; मात्र आता काही प्रमाणात का होईना, हिंदू सजग आणि सतर्क झाले आहेत. अनेकांनी ‘मान्यवर’ने केलेल्या विज्ञापनाच्या विरोधात ट्वीट केले आहेत. यामध्ये ‘कलियुगामध्ये बहुतांश लोकांना सनातन धर्माचा खरा अर्थ कळणार नाही’, असे श्रीकृष्णाने म्हटले आहे’, ‘जर कन्यादान हे पुरुषप्रधान आहे, तर ४ विवाह, तिहेरी तलाक हे स्त्रीप्रधान आहे का ?’, अशा प्रकारची ट्वीट केली आहेत. ‘सामाजिक माध्यमांतून व्यक्त होणार्या संतप्त प्रतिक्रिया म्हणजे हिंदूंच्या मानसिकतेमध्ये होत असलेले सकारात्मक परिवर्तन’, असेच म्हणावे लागेल. हिंदूंना अप्रत्यक्षपणे हिंदु संस्कृतीपासून दूर नेण्याचा, तसेच हिंदु प्रथा-परंपरा यांविषयी हिंदूंचे मन कलुषित करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा ट्विटर आदी सामाजिक माध्यमांवर होत आहे.
ज्याप्रमाणे कन्यारत्न, पुत्ररत्न यामध्ये रत्न म्हणजे केवळ भौतिक संपत्ती किंवा धन असे नसून ‘तुम्हाला प्रिय असलेली गोष्ट’, असा त्याचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे कन्यादानाचा शब्दशः अर्थ ‘कन्येचे दान’ असा होत नाही, तर विवाहाच्या वेळी मुलीचे गोत्र पालटते. विवाहाच्या वेळी उच्चारलेल्या मंत्रांवरून हे सहज लक्षात येईल. त्यामुळे विज्ञापनाच्या माध्यमातून हिंदूंच्या धर्मभावनांवर आक्रमण करणार्या ‘मान्यवर’च्या निषेधासाठी हिदूंनी संघटित व्हावे. तसेच केवळ प्रसिद्धीसाठी हिंदूंच्या प्रथा-परंपरांचा आपल्या सोयीनुसार अर्थ पालटणार्या आणि हिंदु धर्माचा अवमान करणार्या अशा आस्थापनांवर बहिष्कार घालणे, हाच एकमेव पर्याय आहे.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे