श्राद्धामुळे पितृऋण फिटण्यास साहाय्य होते ! – सौ. सुजाता भंडारी, सनातन संस्था
माहेश्वरी समाज महिला मंडळ यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा विधी असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. भाद्रपद पौर्णिमा ते अमावास्या या कालावधीत महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे. सर्व पितरांना सद्गती मिळण्यासाठी पितृपक्षामध्ये श्राद्धविधी करणे महत्त्वाचे आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे केले, त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने कृतज्ञतापूर्वक केले जाते, ते ‘श्राद्ध’ ! श्राद्धामुळे पितृऋण फिटण्यास साहाय्य होते. श्राद्ध करणे, हा धर्मपालनाचाच एक भाग आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. सुजाता भंडारी यांनी केले. माहेश्वर समाज महिला मंडळाच्या वतीने पितृपक्षाच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ आयोजित प्रवचनात बोलत होत्या.
माहेश्वरी समाज महिला मंडळाच्या वतीने अशाच प्रकारच्या ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन बार्शी येथे सौ. पूजा सोमाणी यांनी, लातूर येथे सौ. कांता नावंधर यांनी, तर सांगली येथे सौ. आशा झंवर यांनी केले. सर्व ठिकाणी जिज्ञासूंची चांगली उपस्थिती होती.
अभिप्राय
१. सौ. बसंतीजी भराडीया, जिल्हाध्यक्ष, माहेश्वरी समाज महिला मंडळ, सोलापूर – सर्व माहिती आवडली. आताच्या पिढीने श्राद्धाविषयीची माहिती ऐकणे आवश्यक आहे.
२. अनेकांनी ‘प्रवचन ऐकून श्राद्धाचे महत्त्व समजले’, ‘यापुढे आम्हीही शास्त्रानुसार योग्य कृती करू’, असे अभिप्राय कळवले.