मराठवाडा येथे अतीवृष्टीमुळे २० लाख हेक्टर शेतीची हानी !

पिकांच्या हानीमुळे शेतकर्‍यांसमोर मोठे संकट, घरांचीही पडझड !

मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे झालेली घरांची पडझड

संभाजीनगर – मराठवाड्यात २८ सप्टेंबर या दिवशी अतीवृष्टी झाल्याने जवळपास २० लाख हेक्टर (४९ लाख ४२ सहस्र १०७ एकर) शेतीची हानी झाली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात सरासरी ६१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांच्या कपाशीच्या पिकांची हानी झाली आहे. अन्य पिकांचीही हानी झाल्याने शेतकर्‍यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

अतीवृष्टीमुळे अनेक रस्त्यांची वाहतूक बंद !

नांदेड, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली येथे अतीवृष्टी झाली. त्यामुळे अनेक रस्त्यांची वाहतूक बंद आहे.  ग्रामीण भागाला पावसाचा  अधिक फटका बसला आहे.

परभणी जिल्ह्यात गावांचा संपर्क तुटला !

परभणी जिल्ह्यात २७ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे आधीच ओसंडून वाहणारे नदी, नाले आणि ओढे यांना पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेती पिकांची पुष्कळ हानी झाली असून अनेक भागांत शेत पिके पाण्याखाली गेली आहेत.

जलप्रकल्पांमधून पूर्णा, दुधना आणि गोदावरी या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. यामुळे प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे. अतीवृष्टीने जिल्ह्यातील १ लाख ६० सहस्र हेक्टर (३ लाख ९५ सहस्र ३६८ एकर) शेतीवरील पिकांची हानी झाली आहे; मात्र हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अतीवृष्टीमुळे मूग आणि उडीद या पिकांपाठोपाठ खरिपातील सोयाबीन अन् कापूस या पिकांचीही हानी झाली आहे.

यवतमाळ येथे पुराच्या पाण्यात एस्.टी. बस वाहून ४ प्रवाशांचा मृत्यू !

यवतमाळ येथील उमरखेडमधील दहागावजवळ पुराच्या पाण्यात एक एस्.टी. बस वाहून गेली. यातील ४ प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला. सकाळी ८.३० वाजता उमरखेडवरून ही एस्.टी. बस पुसद येथे जात होती. त्याच वेळी ही दुर्घटना घडली. पुलावरून पाणी वहात असतांनाही एस्.टी. चालकाने बस तशीच पुढे नेली. काही अंतर पुढे गेल्यावर बस पुराच्या पाण्यात पडली आणि बुडाली.

बुलढाणा येथे पैनगंगा नदीच्या पुरात दोघे वाहून गेले !

बुलढाणा येथे जोरदार पाऊस पडत असल्याने नद्यांना पूर आला आहे. २७ सप्टेंबर या दिवशी बुलढाणा तालुक्यातील नांद्रा कोळी येथील २ जण पैनगंगा पुराच्या पाण्यात वाहून जात असतांना एकाने बाभळीच्या झाडाला धरून ठेवल्यामुळे त्याचे प्राण वाचले, तर दुसर्‍या व्यक्तीचा शोध अद्याप चालू आहे.

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – येथील रामपूर, उमरगे येथील बोरी हरणा नदीला महापूर आला आहे. नदीच्या पुलावर ५ फूट पाणी वर आले आहे. कुरनूर आणि नळदुर्ग येथील धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे, त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे. या महापुरामुळे वाहतूकव्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून परराज्यातील अनेक वाहने या मार्गावर अडकून पडली आहेत.

धाराशिव – येथील धरण, नद्या, साठवण तलाव पाण्याने भरून वहात आहेत. २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा प्र्रकल्पातील १८ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे जवळच असलेल्या वाकडी भागात पाणी शिरल्याने १७ जण अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी ‘एन्.डी.आर्.एफ’ची तुकडी बोलवण्यात आली होती.

जालना – अंबड तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे घरे आणि दुकाने यांमध्ये पाणी शिरले आहे. भोकरदन भागातील केळणा नदीला पूर आला आहे, तसेच बुलढाणा-संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.