किल्ले पन्हाळा येथे पुरातत्व विभागाच्या कह्यात असलेल्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे पन्हाळा येथे निवेदन

वर्षानुवर्षे अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर कधी कारवाई होणार ? – संपादक 

निवासी नायब तहसीलदार विनय कौलवकर (मध्यभागी) यांना निवेदन देतांना हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते

पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर), २८ सप्टेंबर (वार्ता.) – पन्हाळा येथील गड भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कह्यात आहे. या गडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून काही शासकीय अधिकार्‍यांनीच या भूमीवर अतिक्रमण केले आहे. तरी किल्ले पन्हाळा येथे पुरातत्व विभागाच्या कह्यात असलेल्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करावी, तसेच गडावरील ऐतिहासिक वास्तू आणि मंदिर यांचा जिर्णाेद्धार करावा, या मागण्यांचे निवेदन हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने पन्हाळ्याचे तहसीलदार यांच्या नावे देण्यात आले. त्यांच्या अनुपस्थितीत निवासी नायब तहसीलदार विनय कौलवकर यांनी हे निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने अधिवक्त्या प्रीती पाटील, अधिवक्ता प्रकाश खोंद्रे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे आणि श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, तसेच अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणारा किल्ला आहे. या वास्तूकडे दुर्लक्ष होत असून गेल्या २ – ३ वर्षांपासून पावसाळ्यात रस्ते खचण्याचे प्रकार, अतिक्रमण आदींमुळे दुर्गप्रमी आणि शिवभक्त यांच्यामध्ये अप्रसन्नता आहे. त्यामुळे येथे अतिक्रमण करणार्‍यांवर योग्य ती कारवाई करून गडाचे पावित्र राखले जावे. पन्हाळा गडावर जाणार्‍या मार्गावर असणार्‍या नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीस्थळाला पावसाच्या पाण्यामुळे धोका निर्माण झाला आहे. याविषयी योग्य ती कारवाई करावी.