चारित्र्यवान लोकांचे संघटन झाले, तर देश निश्चित पालटेल ! – अण्णा हजारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
नगर, २८ सप्टेंबर – देशातील माजी सैनिकांनी ठरवले, तर हा देश पालटायला वेळ लागणार नाही. भक्कम संघटनेविना प्रश्न सुटत नाहीत. राजकारणातून गावाचा विकास होऊ शकत नाही. त्यासाठी सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोन असलेले नेतृत्व हवे असून ते निष्कलंक असावे. चारित्र्यवान लोकांचे संघटन झाले, तर सरकारचे नाक दाबता येते. प्रत्येक सैनिकाने निवृत्तीनंतर स्वत:च्या गावासाठी योगदान दिले, तर गावेही पालटायला वेळ लागणार नाही, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी व्यक्त केला. ‘भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यास’ आणि ‘पारनेर तालुका माजी सैनिक मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिकांचे पहिले प्रशिक्षण शिबीर राळेगणसिद्धीमध्ये २७ सप्टेंबर या दिवशी घेण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी माजी सैनिकांमधील शिस्त, देशनिष्ठा, काम करण्याची चिकाटी या गुणांचा उपयोग चळवळीसाठी कसा करून घेता येईल ? यासंबंधी चर्चा झाली. माजी सैनिकांचे हे संघटन देशपातळीवर उभारण्याच्या दृष्टीने हालचाली चालू करण्यात आल्या आहेत. सध्या देशात ९ लाख माजी सैनिक आहेत. प्रतिवर्षी ७० सहस्र नव्याने निवृत्त होणार्यांची संख्या आहे. या सैनिकी शिस्त अंगात रुजलेल्या कार्यकर्त्यांचा आंदोलने आणि सामाजिक कार्य यांसाठी वापर करण्याचे नियोजन आहे.