दीड वर्षांनंतर सौंदत्ती (कर्नाटक) येथील श्री यलम्मादेवीचे मंदिर खुले
बेळगाव (कर्नाटक), २८ सप्टेंबर – कर्नाटक-महाराष्ट्र यांसह सहस्रो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सौंदत्ती येथील श्री यलम्मादेवीचे मंदिर दीड वर्षांनंतर २८ सप्टेंबर या दिवशी भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळी ६.३० वाजता विशेष पूजा झाल्यावर भक्तांना मुखदर्शन घेण्यासाठी मंदिर खुले करण्यात आले. मंदिरात ठिकठिकाणी फुलांची तोरणे, केळीचे खुंट बांधून मंदिर परिसर सजवण्यात आला आहे, तसेच गाभार्यातील मूर्ती आणि पूर्ण गाभारा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते.
१. उत्तर कर्नाटकातील शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणार्या या मंदिरात भक्तांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिराच्या आधी येणारे उगरगोळ, जोगणभावी, सौंदत्ती येथे ठिकठिकाणी ‘बॅरिकेट्स’ लावण्यात आले आहेत.
२. ‘‘भक्तांना रांगेत सोडण्यासाठी सामान्य आणि विशेष अशा दोन रागांची व्यवस्था केली आहे. या दोन्ही रांगा महाद्वाराजवळ जाऊन मिळतात. देवीचे दर्शन भक्तांनी इकडे तिकडे न फिरता रांगेतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बाहेर जायचे आहे. भक्तांनी कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन करावे’’, असे आवाहन मंदिराचे व्यवस्थापक रवि कोटारगस्ती यांनी केले आहे.
३. दीड वर्षांपासून व्यापार नसल्याने डोंगरावरील फळविक्रेते, फुलविक्रेते यांसह सर्वच व्यापारी संकटात सापडले होते. यामुळे भक्तांसह व्यापार्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.