कपडे वारंवार धुतल्याने होत आहे पर्यावरणाची अतोनात हानी ! – रसायनतज्ञांचा निष्कर्ष

  • महासागरांचे प्लास्टिकमुळे होणार्‍या प्रदूषणामध्ये कपडे धुण्याचा वाटा तब्बल ३५ टक्के !  

  • एकदा घातलेले कपडे परत परत वापरण्याचा तज्ञांचा सल्ला !

  • विज्ञानाचा उदो उदो करत मानवाने ऐहिक प्रगती तर साधली; परंतु त्यामुळे निसर्गाची भरून न निघणारी हानी केली. महासागरांचे होत असलेले हे प्रदूषण त्याचेच द्योतक होय. – संपादक 
  • हिंदु धर्माच्या शिकवणीनुसार अध्यात्माची सांगड घालून विज्ञानाचा संयत उपयोग केला असता, तर जगासमोर संकटाची स्थिती निर्माण झाली नसती ! मानवाने आतातरी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अध्यात्माची कास धरून विज्ञानाचा आवश्यक तेवढा उपयोग करावा, तरच मानवाच्या भावी पिढ्यांना सुखाने आयुष्य जगता येईल ! – संपादक 
  • प्लास्टिकचे पर्यावरणावरील दुष्परिणाम ही विज्ञानाची प्रगती आहे का ? – संपादक 
(प्रतिकात्मक छायाचित्र)

मुंबई – पूर्वी हाताने कपडे धुतले जात असत. त्यात काळानुरूप पालट होत गेला आणि आता कपडे धुण्याची यंत्रे आली आहेत. त्यामुळे कपडे धुणे आता अधिक सोयीस्कर झाले आहे; परंतु नियमित कपडे धुतल्याने मग ते हाताने असोत की, धुलाईयंत्राने (‘वॉशिंग मशीन’ने), त्याने पर्यावरणाची हानी होत असल्याचे रसायनतज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास टाळण्यासाठी कपडे कमीत कमी धुवावेत आणि एकदा घातलेले कपडे परत परत वापरावेत, असा सल्ला रसायनतज्ञांनी दिला आहे. (याला म्हणतात ‘रोगापेक्षा उपाय भयंकर’ ! अध्यात्मशास्त्रानुसार कपडे न धुता घातल्याने मानवाभोवती रज-तमाचे त्रासदायक आवरण निर्माण होते. त्यामुळे मानवाचे जीवन अधिक संघर्षमय बनू शकते, हे लक्षात घ्या ! – संपादक)

कपड्यांचे पालटते प्रकारही प्रदूषणाला कारणीभूत

याविषयी ‘सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्रीज’च्या तज्ञांनी अहवाल सादर केला आहे. या अहवालाप्रमाणे जेव्हापासून धुलाईयंत्राचा वापर वाढला, तेव्हापासून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी चालू झाली. केवळ एकदा धुलाईयंत्र वापरल्यावर अनुमाने ७ लाखांहून अधिक ‘मायक्रोस्कोपिक प्लास्टिक फायबर’ वातावरणात सोडले जातात. हे प्लास्टिक फायबर आपल्याच कपड्यांमधून निघालेले असतात आणि ते पाण्यावाटे नदी-नाल्यांमध्ये पोचतात. त्यांचा पाण्यात रहाणार्‍या जलचरांवर अनिष्ट परिणाम होतो. याचा अर्थ हा नव्हे की, हा धुलाईयंत्रांचा दुष्परिणाम आहे. कपड्यांचे पालटते प्रकार यास कारणीभूत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. आज कपडे केवळ सुती म्हणजे नैसर्गिक नसून ‘सिंथेटिक’ (रसायनांच्या साहाय्याने बनवलेले) गोष्टींचा वापर करूनही बनवले जात आहेत. यामध्ये पॉलिस्टर, नायलॉन, ॲक्रेलिक आदी प्रकारांचा समावेश आहे. हे सर्व प्लास्टिकचेच प्रकार असून यांच्यापासून कपडे बनवले जात असल्याने कपड्यांच्या धुण्याने कपड्यांतील ‘मायक्रोप्लास्टिक’ पाण्यात मिसळतात आणि पुढे नद्या, समुद्र, महासागर यांत मिसळतात. मायक्रोप्लास्टिक यांची लांबी ५ मिलिमीटर असून त्यांचा परिघ मायक्रोमीटरमध्ये म्हणजे मिलिमीटरचा १००० वा भाग एवढा लहान असल्याने ते डोळ्याला दिसत नाहीत. त्यामुळे त्यांना ‘मायक्रोप्लास्टिक’ म्हटले जाते. ‘वॉक्स’ या अमेरिकी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०१७ मध्ये केलेल्या एका संशोधनातून महासागरांमध्ये होणार्‍या प्लास्टिक प्रदूषणामध्ये ३५ टक्के प्रदूषण हे कपड्यांतून निघालेल्या या मायक्रोप्लास्टिकमुळे होत आहे. यातून याची भयावहता स्पष्ट होते.

निसर्गतज्ञांनी सुचवलेले उपाय !

१. अशा धुलाईयंत्रांचे उत्पादन होणे आवश्यक आहे, ज्यांतून ‘मायक्रोस्कोपिक प्लास्टिक फायबर’ पाण्यावाटे निघून जाणार नाहीत, तर ते यंत्रातच अडवले जातील.

२. कापड उत्पादन करणार्‍या आस्थापनांनी कपडे धुतांना मायक्रोप्लास्टिक मोठ्या प्रमाणात सोडले जाणार नाही, अशाप्रकारचे संशोधन करून तशा कापडाचे उत्पादन करणे आवश्यक आहे.

३. लोकांनी आवश्यक तेवढेच कपडे विकत घ्यावेत.