नक्षलवादाची समस्या एका वर्षात सोडवा ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही नक्षलवादासारख्या भीषण समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघू न शकणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक
नवी देहली – नक्षलवाद्यांच्या विरोधातील लढा आता अंतिम टप्प्यात पोचला आहे आणि त्याला जलद आणि निर्णायक बनवण्याची आवश्यकता आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे होणार्या मृत्यूंची संख्या एका वर्षात घटून २०० वर आली आहे. येत्या एका वर्षात नक्षलग्रस्त भागांतील नक्षलवादाची समस्या सोडवावी, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले. यासाठी त्यांनी काही सूत्रे मांडली. यांमध्ये नक्षलवाद्यांकडील पैशांचा ओघ रोखण्यासाठी संयुक्त रणनीती आखण्याचा प्रामुख्याने समावेश होता. या बैठकीला नक्षलग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यमंत्री आणि उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. बैठकीला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उपस्थित होते. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस्. जगन मोहन रेड्डी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत; परंतु या ४ राज्यांचे प्रतिनिधित्व वरिष्ठ अधिकार्यांनी केले.
शहा म्हणाले की, एका वर्षात नक्षलवाद संपवण्यासाठी कारवायांचा वेग वाढवणे आणि उत्तम समन्वय साधणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या यंत्रणांनी एकत्रितपणे व्यवस्था करून हे थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्या पातळीवर नियमित आढावा घेतला गेला, तर खालच्या स्तरावरील समन्वयाच्या समस्या आपोआप सुटतील.