संतांचे वागणे, आत्मज्ञानाचा अधिकार आणि स्थिरबुद्धी यांविषयी ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथातील विवेचन
२६ सप्टेंबर २०२१ या दिवशी ‘ज्ञानेश्वरी जयंती’ झाली. त्या निमित्ताने….
भगवंताला कोणता भक्त प्रिय असतो ?
हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाहला ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय १२, ओवी २१३
अर्थ : भगवंताला कोणता भक्त प्रिय असतो ?
तर ‘सगळे विश्वच माझे घर आहे’, अशी ज्याची दृढ समजूत आहे; किंबहुना जो स्वतःच चराचर सृष्टी बनला आहे, असा भक्त.
संतांचे वागणे
मार्गाधारें वर्तावे । विश्व हें मोहरे लावावें ॥
अलौकिका नोहावें लोकांप्रती ।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ३, ओवी १७१
अर्थ : कर्मयोगाचे आचरण करून जगाचे मन आपल्या आचरणाकडे लावून घ्यावे; परंतु लोकांच्या ठिकाणी आसक्ती ठेवू नये.
आत्मज्ञानाचा अधिकार कुणाला असतो ?
वाचस्पतीचेनि पाडें । सर्वज्ञता तरी जोडे ।
परि वेडिवेमाजि दडे । महिमे भेणें ॥
चातुर्य लपवी । महत्त्व हारवी ।
पिसेपण मिरवी । आवडोनि ।
लौकिकाचा उद्वेगु । शास्त्रांवरी उबगू ।
उगेपणी चांगु । आथी भरु ॥
जगें अवज्ञाचि करावी ।
संबंधीं सोयचि न धरावी ।
ऐसी ऐसी जीवीं । चाड बहु ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय १३, ओवी १९१ ते १९३
अर्थ : बृहस्पतीसारखी सर्वज्ञता जरी अंगी असली, तरी आपले माहात्म्य लोकांत वाढेल, या भीतीने जो वेड्यासारखा वागतो, ज्याला कीर्तीचा कंटाळा असून, प्रवृत्तीशास्त्रांवरील वादविवादांची हयगय करून स्वस्थपणे बसण्याचीच फार आवड असते, त्याला ज्ञान हस्तगत होते. लोकांनी आपला अपमान करावा आणि आप्तवर्गांनी आपली चिंता करू नये, अशी ज्याच्या मनाला फार आवड असते, त्याला ज्ञान हस्तगत होते.
स्थिरबुद्धीचे लक्षण
तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती ।
तयाची प्रज्ञा जाण स्थिति । पातली असे ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय २, ओवी ३०२
अर्थ : ‘ज्याची इंद्रिये स्वाधीन असून तो म्हणेल त्या आज्ञेप्रमाणे इंद्रिये वागतात आणि करतात, त्याचीच बुद्धी स्थिर झाली’, असे समज !
(संदर्भ : सनातन संस्थेचे संकेतस्थळ)