पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत करापोटी ‘राष्ट्रीय लोक अदालती’तून १५ कोटी रुपयांची वसुली !
पुणे, २६ सप्टेंबर – जिल्ह्यातील थकबाकीदार कुटुंबाकडील ग्रामपंचायत कराची वसुली करण्यासाठी २६ सप्टेंबर या दिवशी झालेल्या ‘राष्ट्रीय लोक अदालती’मध्ये ग्रामीण भागातील २२ सहस्र ७६६ कुटुंबांच्या दाव्यांचा निकाल लावला गेला त्यानुसार त्यातून ग्रामपंचायतींना करापोटी १५ कोटी ७९ लाख ७९ सहस्त्र १६७ रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील १ सहस्त्र ३९९ ग्रामपंचायतींना झाला.
कराच्या थकबाकी वसुलीसाठी सर्व ग्रामपंचायतींनी करवसुली थकबाकी मागणीच्या नोटिसा न्यायालयाद्वारे संबंधितांना पाठवल्या होत्या. त्यानंतर या ‘लोक अदालत’ चे आयोजन करून दाखल पूर्व खटले निकालात काढण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. या तडजोडीनंतरही ग्रामीण भागातील ४२ सहस्र ३५४ कुटुंबांकडे अजूनही कराची थकबाकी राहिली आहे.