माथाडी मंडळावर लावलेल्या आयकराविषयी सकारात्मक निर्णय घेऊ ! – भूपेंद्र यादव, केंद्रीय कामगार मंत्री
नवी मुंबई – माथाडी मंडळावर लावलेल्या आयकरावर सवलत देण्याविषयी संबंधित विभागाशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेणार आहोत, असे आश्वासन केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी तुर्भे येथे माथाडी कामगारांच्या मेळाव्यात दिले. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक माजी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगार भवन येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी यादव बोलत होते.
ते पुढे असेही म्हणाले की, असंघटित कामगारांना न्याय मिळावा; म्हणून केंद्र सरकारने ‘ई श्रम पोर्टल’ चालू केले असून या पोर्टलवर १ कोटी ६० लाख कामगारांनी नोंदणी केली असून नरेंद्र पाटील यांनीही त्यांच्या सर्व कामगारांची या पोर्टलवर नोंद करावी. माथाडी कामगारांच्या केंद्र स्तरावरील न्याय्य मागण्यांसाठी देहलीत बैठक घेऊन त्या मार्गी लावू.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील म्हणाले की, रेल्वे धक्क्यावर काम करणार्या माथाडी कामगारांची वाईट परिस्थिती आहे. प्रवासी रेल्वे धक्क्यावर आता केंद्र सरकार यांत्रिक ट्रॉली आणणार आहे; पण अशा स्थितीत माथाडी कामगार काय करणार ? यासाठी मार्ग काढला पाहिजे. ‘भविष्य निर्वाह निधी’ आणि ‘ग्रॅज्युएटी’ हे माथाडी मंडळात असते; पण हे मंडळाचे उत्पन्न असल्याचे दाखवून त्यावर आयकर लावण्यात आला आहे. यापूर्वी यातून मार्ग काढण्यात आला होता, तसा आताच्याही सरकारने पूर्वीप्रमाणे यातून माथाडी मंडळाला सवलत द्यावी. माथाडी कायदा देशात लागू करण्यासाठी वर्ष २०१८ मध्ये समिती गठीत केली होती. त्यांच्या शिफारशीनुसार लवकरात लवकर हा कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात यावा.