६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. मोहन चतुर्भुज आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. अधिवक्ता चारुदत्त जोशी यांच्या आजारपणाची वार्ता कळल्यावर अन् त्यांच्या निधनानंतर साधिकेला सूक्ष्मातून दिसलेली दृश्ये !
१. पुणे येथील साधक मोहन चतुर्भुज (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
१ अ. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे काकांना रुग्णालयात भरती केल्याचे कळल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टर सुक्ष्मातून त्यांच्या जवळ आहेत’, असे साधिकेला दिसणे : ‘एप्रिल २०२१ मध्ये पुण्यातील साधक मोहन चतुर्भुज यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती केले होते. याविषयी मला रामनाथी आश्रमात चतुर्भुज काकूंकडून समजले. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून चतुर्भुजकाकांच्या जवळ आहेत आणि त्यांना प्रतिदिन काहीतरी सांगत आहेत’, असे मला दिसले.
१ आ. काकांची प्रकृती गंभीर झाल्याचे कळल्यावर ‘गुरु शिष्याचा हात पकडून त्याला मोक्षापर्यंत घेऊन जात आहेत’, असे दृश्य दिसणे : नंतर ‘काकांची प्रकृती गंभीर झाली आहे’, असे मला समजले. तेव्हा सनातन संस्थेच्या एका प्रसिद्धी पत्रकावर असलेल्या ‘गुरु शिष्याचा हात पकडून त्याला मोक्षापर्यंत घेऊन जात आहेत’, या चित्राचे मला दर्शन झाले. त्या वेळी ‘काका जिवंत आहेत आणि मी नकारात्मक विचार करत आहे’, असे वाटून मी त्या दृश्याकडे दुर्लक्ष केले.
१ इ. काकांच्या निधनानंतर ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना सूक्ष्मातून रामनाथी आश्रमात आणून त्यांच्या कुटुंबियांना भेटवले आणि काकांना महर्लाेकात नेले’, असे सूक्ष्मातून दिसणे अन् काही दिवसांत काकांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित होणे : त्यानंतर ३०.४.२०२१ या दिवशी काकांचे पुणे येथे निधन झाले. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून काकांचा हात धरून त्यांना रामनाथी आश्रमात आणले आहे’, असे मला दिसले. ‘गुरुदेवांनी आश्रमात काकांना त्यांची पत्नी (चतुर्भुजकाकू) आणि मुलगी कु. मधुरा यांना भेटवले अन् ते काकांना म्हणाले, ‘आता समाधान झाले ना ! मधुराला आणि पत्नीला पाहिले ना ? चला, आता निश्चिंत होऊन पुढचा प्रवास करूया.’ तेव्हा चतुर्भुजकाका पुष्कळ आनंदी झाले आणि म्हणाले, ‘गुरुदेव, त्या दोघी तुमच्या चरणांशी आहेत. त्यामुळे मला कसलीच काळजी नाही.’ काका कृतज्ञताभावाने परात्पर गुरुदेवांसमवेत महर्लाेकात गेले.’ हे सर्व मला सूक्ष्मातून दिसले. (‘चतुर्भुजकाकांचे निधन झाले, तेव्हा त्यांची पत्नी आणि मुलगी कु. मधुरा रामनाथी आश्रमात रहात होते. कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी असल्यामुळे त्यांना काकांच्या आजारपणात आणि निधनानंतर पुणे येथे जाता आले नव्हते.’ – संकलक)
त्यानंतर काही दिवसांतच, म्हणजे ११.५.२०२१ या दिवशी काकांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित झाले. ते कळल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक साधक-जिवाची कशी काळजी घेतात ?’, हे पाहून मला कृतज्ञता वाटली.
२. संभाजीनगर येथील अधिवक्ता चारुदत्त जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
२ अ. ‘अधिवक्ता चारुदत्त जोशी कोरोनामुळे रुग्णालयात आहेत’, असे कळल्यावर सूक्ष्मातून ‘दोन विष्णुदूत त्यांच्याजवळ थांबले आहेत’, असे सूक्ष्मातून दिसणे : एप्रिल २०२१ मध्ये ‘अधिवक्ता चारुदत्त जोशी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे ते रुग्णालयात भरती झाले आहेत’, असे मला कळले होते. त्यांच्या पत्नी श्रीमती अनिता जोशी यांच्याशी माझी पुष्कळ जवळीक आहे. अधिवक्ता चारुदत्त जोशी यांच्या संदर्भातील बातमी कळल्यावर मला सूक्ष्मातून ‘दोन विष्णुदूत (गरुडाप्रमाणे पंख असलेले; पण मनुष्याप्रमाणे दिसणारे) चारुदत्त यांच्याजवळ थांबले आहेत’, असे सूक्ष्मातून दिसले. मंदिराच्या दाराजवळ दोन्ही बाजूला जशा देवता उभ्या असतात, त्याप्रमाणे ते दिसत होते.
२ आ. या कालावधीत ‘एकदा दोन्ही विष्णुदूत चारुदत्त यांचा लिंगदेह घेऊन उडत जात आहेत’, असे मला दिसले.
२ इ. अधिवक्ता चारुदत्त जोशी यांचे निधन झाल्यावर ‘ते विष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवांच्या चरणी लीन झाले’, असे वाटणे आणि २ मासांनी त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित होणे : त्यानंतर दोन दिवसांनी, म्हणजे २८.४.२०२१ या दिवशी अधिवक्ता चारुदत्त जोशी यांचे निधन झाले. तेव्हा ‘ते विष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवांच्या चरणी लीन झाले आहेत’, असे जाणवून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. नंतर जवळ जवळ २ मासांनी, म्हणजे २५.६.२०२१ या दिवशी त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित झाले. त्या वेळी ‘त्यांना आता महर् लोकात स्थान प्राप्त झाले’, असे वाटून मला पुष्कळ आनंद झाला.
३. साधकांत असलेल्या भावानुसार ‘परात्पर गुरुदेव त्यांना दर्शन देत असून स्वतःत सामावून घेत आहेत’, असे जाणवून गुरुदेवांच्या बोलाची प्रचीती येणे
वरील दोन्ही अनुभूती आल्यावर ‘ज्या साधकाचा जसा भाव असतो, तसे गुरुदेव त्याला त्या त्या स्वरूपात दर्शन देऊन स्वतःमध्ये सामावून घेत आहेत’, असे जाणवून माझी भावजागृती झाली. ‘मी शेवटपर्यंत प्रत्येक साधकासमवेत असेन !’ या परात्पर गुरुदेवांच्या बोलाची मला प्रचीती आली. जन्म देणारी आई स्थूल देहापुरतीच समवेत राहू शकते; परंतु परात्पर गुरुदेव मात्र केवळ याच नव्हे, तर प्रत्येक जन्मात साधकांच्या सूक्ष्मदेहाच्या समवेत असतात.
या भावस्मरणाने (गुरुदेवांच्या बोलाने) मला पुष्कळ आनंद झाला. या आनंदाच्या भरात मला माझ्या देहात बराच काळ आल्हाददायक संवेदना जाणवत होत्या.’
– होमिओपॅथी वैद्या कु. आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.७.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |