सातारा ते पुणे महामार्ग दुरुस्तीसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद !
सातारा, २६ सप्टेंबर (वार्ता.) – सातारा ते पुणे महामार्गावरील अपघात, दुर्घटना टाळण्यासाठी, महामार्ग आणि सेवा रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी ५० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे जाहीर केले. तसेच ३ मासांत काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिले.
केंद्रीय मंत्री गडकरी सातारा जिल्हा दौर्यावर असतांना अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन त्यांना महामार्गाच्या दुरावस्थेची सचित्र निवेदने दिली. निवेदनामध्ये म्हटले आहे की, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार यांना अनेक वेळा सूचना करूनही कोणतीही कार्यवाही होत नाही. सक्तीने पथकर वसुली होते; मात्र सुविधा पुरवल्या जात नाहीत. अनेक पथकर नाक्यावर भ्रष्टाचार होत असून ते थांबवले पाहिजेत.