श्री. किरण कुलकर्णी यांना त्यांच्या मातोश्री कै. श्रीमती रोहिणी भालचंद्र कुलकर्णी (वय ७० वर्षे) यांनी केलेली साधना आणि त्यांचे आजारपण यांविषयी जाणवलेली सूत्रे
श्री. किरण कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती रोहिणी भालचंद्र कुलकर्णी (वय ७० वर्षे) यांचे २१.५.२०२१ या दिवशी निधन झाले. श्री. किरण कुलकर्णी यांनी त्यांच्या आईची गुणवैशिष्ट्ये आणि आईच्या आजारपणात त्यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. श्रीमती रोहिणी भालचंद्र कुलकर्णी यांना असलेली साधनेची आवड !
१ अ. आईला देवाधर्माची आवड असणे आणि तिने संपर्कात येणार्या सर्वांना चांगल्या कृती अन् संस्कार यांची शिकवण देणे : ‘माझ्या आईला अध्यात्म आणि देवधर्म यांची आवड होती. ती ‘प्रत्येक गोष्ट देवाच्या साक्षीने घडते’, यावर विश्वास ठेवणारी होती आणि ‘त्यावर इतरांनीही विश्वास ठेवावा’, यासाठी ती सतत प्रयत्न करत होती. त्यामुळे आम्हीही तसेच घडलो. आम्हालाच नव्हे, तर तिच्या संपर्कात येणार्या प्रत्येकालाच ती चांगल्या कृती आणि संस्कार यांची आवर्जून शिकवण देत होती.
१ आ. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संपर्कात आल्यावर आईमध्ये साधनेची आवड निर्माण होणे अन् तिच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती श्रद्धा वाढू लागणे : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने होणार्या कार्यक्रमांमुळे मागील ७ – ८ वर्षांपासून आईमध्येही साधनेची पुष्कळ आवड निर्माण झाली होती. तिला नामजपाचे महत्त्व पटले होते. ती माझ्या समवेत सत्संगांना आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभांना यायची. गोव्याला अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशनाच्या निमित्ताने आल्यावर माझी परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाली आणि मला त्यांच्या सत्संगाचा लाभ मिळाला. त्यानंतर माझ्या आईची गुरुदेवांप्रती असलेली श्रद्धा वृद्धींगत झाली. आईला ‘मी ईश्वराच्या जवळ आहे’, असे वाटू लागले होते.
१ इ. सायंकाळी घरी आईसह नामजप आणि आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करतांना आईने साधनेमुळे स्वतःत झालेले पालट अन् आलेल्या अनुभूती सांगणे : आम्ही प्रतिदिन सायंकाळी आमच्या घरी नित्य साधना करत असू. ‘आई, साधना !’, असे मी म्हटले की, ती लगेच घरातील नेहमीच्या एका ठिकाणी जाऊन बसत असे. त्यानंतर आम्ही सामूहिक नामजप करायचो. ‘२ – ३ आध्यात्मिक ग्रंथांतील लिखाणाचे थोडे वाचन करणे, त्याविषयी मनन-चिंतन करणे आणि प्रार्थना अन् कृतज्ञता व्यक्त करणे’, असा आमचा नित्य क्रम असे. त्या वेळी आई ‘साधनेमुळे तिच्यात होणारे पालट, तसेच तिला आलेली अनुभूती’, यांविषयी सांगत असे.
१ ई. आईला असलेली प्रसारकार्याची आवड : आईने अनेक वेळा तिच्या परिचित महिलांना एकत्र करून सनातनचा धर्मशिक्षणवर्ग आणि सत्संग यांचे नियोजन केले आहे.
१ उ. आईने ‘चूक होऊ नये’, यासाठी प्रयत्न करणे आणि साधनेमुळे आईतील राग, लोभ आदी न्यून होऊ लागणे : आई मागील ७ – ८ मासांपासून ‘चुका अत्यल्प व्हाव्यात किंवा होऊ नयेत’, यासाठी प्रयत्न करत होती. तिच्याकडून चूक झाल्यास तिला त्याची जाणीव व्हायची आणि ती स्वतःची चूक सांगायची. साधनेमुळे तिच्यातील ‘राग-लोभ’ न्यून झाले होते. ती ईश्वरासाठी अतिशय व्याकुळ होत असे.
१ ऊ. साधनेमुळे आईला जीवनात तृप्तता आल्याचे जाणवणे : साधनेमुळे आईमध्ये तृप्तता आली होती. ‘मला भगवंताने पुष्कळ काही दिले आहे’, असे तिला वाटायचे. ‘परमेश्वराकडे व्यावहारिक जीवनातील कोणतीही गोष्ट मागू नये’, हे सूत्र आचरणात आणण्यासाठी ती जाणीवपूर्वक प्रयत्न करत होती.
२. आईला आलेली अनुभूती – रात्री झोपेत आईला पाठीवर एका उन्नत व्यक्तीचा आश्वस्त आणि चैतन्य निर्माण करणारा स्पर्श जाणवणे
आईच्या निधनापूर्वी अनुमाने २५ दिवस आधी एकदा रात्री झोपेत असतांना तिला ‘कुणीतरी पाठीवर हात ठेवला आहे आणि तो हात सर्वसाधारण व्यक्तीचा नसून उन्नत व्यक्तीचा हात आहे’, असे जाणवले. हा स्पर्श तिला आश्वस्त करणारा होता. तिला एक वेगळेच चैतन्य निर्माण करणार्या स्पर्शाची अनुभूती आली.
३. आईचे आजारपण
३ अ. नातीसह फिरायला गेल्यावर कुत्र्याने आईच्या शरिराला बर्याच ठिकाणी चावा घेणे आणि पुष्कळ वेदना होत असतांनाही आईने नामजप करणे : वरील अनुभूती आल्याच्या दुसर्या दिवशी संध्याकाळी आई तिच्या नातीसह फिरायला बाहेर गेली. काही वेळाने ‘आईला कुत्रा चावला’, असा आम्हाला भ्रमणभाष आला. आम्ही त्या ठिकाणी गेल्यावर ‘आईच्या शरिराला बर्याच ठिकाणी कुत्र्याने चावा घेतला आहे’, असे आमच्या लक्षात आले. आईला पुष्कळ वेदना होत होत्या; पण त्या स्थितीतही ती अखंड नामजप करत होती. आई मला म्हणाली, ‘‘किरण, मला त्या कुत्र्याचा राग आला नाही. हे माझेच प्रारब्ध आहे. देव माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मी त्या कुत्र्याच्या जबड्यातून सुटले. नाहीतर, त्या कुत्र्यासमोर माझे काही खरे नव्हते.’’
३ आ. आईला परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेला ‘ऑनलाईन’ भावसोहळा पहाता येणे : या घटनेनंतर आईचा नामजप अधिक प्रमाणात होऊ लागला. तिच्या साधनेचे फळ म्हणून आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेला भावसोहळा ‘ऑनलाईन’ पहाण्याची आणि गुरुदेवांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. त्यानंतर ‘मी धन्य झाले’, असा भाव आईच्या मनात निर्माण झाला.
३ इ. आईला सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याशी भ्रमणभाषवरून संवाद साधण्याची संधी मिळणे : नंतर ४ दिवसांनी आम्हाला सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याशी भ्रमणभाषवर संवाद साधण्याची संधी मिळाली. आईने सद्गुरु स्वाती खाडये यांना तिला ‘आलेल्या अनुभूती, साधना आणि नामजप यांमुळे मिळत असलेला आनंद’ यांविषयी ‘स्वतःच्या आईला सांगावे’, इतक्या सहजपणे सांगितले.
३ ई. आईचे आजारपण वाढल्याने तिला रुग्णालयात भरती करण्यात येणे
३ ई १. आधुनिक वैद्यांनी सांगितल्यानुसार आईला विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणे, तिला श्वास घ्यायला पुष्कळ त्रास होत असणे आणि अशा स्थितीतही तिने नामजप करणे : त्यानंतर ४ – ५ दिवसांनी आईला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे आम्ही तिला रुग्णालयात घेऊन गेलो. आधुनिक वैद्यांनी आईला तपासले आणि आम्हाला सांगितले, ‘‘आता त्यांना विलगीकरण कक्षात ठेवावे लागेल आणि तेथेच त्यांचा शेवट होईल !’ त्या वेळी माझी स्थिती फारच वाईट झाली. मी जड अंतःकरणाने आईला रुग्णालयातील कक्षात घेऊन गेलो. तेथील वातावरण पाहून आई सर्वकाही समजून चुकली होती. ती शांतपणे भिंतीला टेकून डोळे मिटून बसली. मी आईला २ – ३ वेळा विचारले, ‘‘काय करत आहेस ?’ तेव्हा ती क्षीण आवाजात म्हणाली, ‘‘मला श्वास घ्यायला पुष्कळ त्रास होत आहे. त्यामुळे मी मनात नामजप करत आहे.’’
३ ई २. आईसाठी प्रार्थना आणि नामजप करणे : त्या रात्री एक वाजता मी आमच्या घरातील देवघरात बसून एका पंचपात्रात पाणी घेऊन त्यात उजव्या हाताची बोटे बुडवून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केला. आरंभी मी ‘आईचे आरोग्य चांगले रहावे किंवा तिला अंतिम समयी त्रास न होता ती लवकरात लवकर या त्रासातून मुक्त व्हावी’, यासाठी नामजप केला.
४. आईचे निधन झाल्याने दुःख होणे; मात्र साधनेमुळे आईची त्रासातून लवकर सुटका झाल्याने गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटणे
दुसर्या दिवशी सकाळी आम्हाला रुग्णालयातून भ्रमणभाष आला, ‘‘तुमच्या नातेवाईकाचे निधन झाले आहे.’’ आम्ही लगेच रुग्णालयात गेलो. तिथे आईचा देह ‘तिने जणू साष्टांग नमस्कार केला आहे’, अशा स्थितीत आढळला. तेव्हा मला आई गेल्याचे दुःख झालेच; पण रात्री गुरूंच्या कृपेमुळे मी जो संकल्प आणि प्रार्थना केली होती, त्याची मला प्रचीती आली. त्या वेळी मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटू लागली. नंतर आम्ही जवळच असलेल्या रुग्णालयाच्या कार्यालयात गेलो. तेथील परिचारिका म्हणाली, ‘‘तुमच्या आई सतत नामजप आणि नमस्कार करत होत्या. त्या धार्मिक होत्या का ?’’‘आईने केलेला नामजप आणि साधना यांमुळे तिच्या मृत्यूसमयी तिच्यावर भगवंताची आणि परात्पर गुरु डॉक्टरांची कशी कृपा झाली !’, हे मी प्रत्यक्ष अनुभवले.
कृतज्ञता
परात्पर गुरु डॉक्टरांनी दाखवलेल्या मार्गाने प्रवास चालू केला, तर ‘येणार्या प्रत्येक संकटात गुरुदेव आपल्या समवेत असतात आणि तेच आपल्याला साधना करता यावी’, अशा अनुकूल परिस्थितीतही ठेवतात’, याची आम्हाला प्रचीती आली. ‘गुरुदेवांचे आपल्यावर लक्ष असून त्यांची अखंड कृपा आहे’, याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला. यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. किरण कुलकर्णी (शिवसेना शहरप्रमुख), कागल, जिल्हा कोल्हापूर. (३१.७.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |