माहिती कार्यालये अधिक सक्षम आणि सुसज्ज करण्यावर भर देणार ! – डॉ. संभाजी खराट, माहिती उपसंचालक
माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांची सांगली जिल्हा माहिती कार्यालयास सदिच्छा भेट
सांगली, २६ सप्टेंबर – शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम जिल्हा माहिती कार्यालयातून अधिक प्रभावी व्हावे, यासाठी माहिती कार्यालये अधिक सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी केले. डॉ. संभाजी खराट यांनी २३ सप्टेंबर या दिवशी सांगली येथील जिल्हा माहिती कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
त्यांचे स्वागत सांगली जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले. या प्रसंगी माहिती साहाय्यक रणजित पवार, शंकरराव पवार, सुधीर पाटील, बन्सीलाल मांडवे, नागेश वरुडे उपस्थित होते. डॉ. संभाजी खराट यांनी नुकताच माहिती उपसंचालक कोल्हापूर विभागाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई, कोल्हापूर, कोकण भवन, रत्नागिरी, ठाणे, मंत्रालय या ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी तसेच वरिष्ठ साहाय्यक संचालक पदाचे दायित्व सांभाळले आहे. डॉ. खराट यांनी पत्रकारितेत ‘पी.एच्.डी.’ केली असून त्यांची २५ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.