कागल (जिल्हा कोल्हापूर) येथील सनातनचे हितचिंतक श्री. किरण कुलकर्णी यांनी त्यांचे वडील (कै.) भालचंद्र कुलकर्णी (वय ८२ वर्षे) यांच्या आजारपणात आणि निधनाच्या वेळी साधनेच्या दृष्टीने केलेले प्रयत्न !
कागल (जिल्हा कोल्हापूर) येथील शिवसेनेचे शहरप्रमुख आणि सनातनचे हितचिंतक श्री. किरण कुलकर्णी यांचे वडील भालचंद्र विनायक कुलकर्णी (वय ८२ वर्षे) यांचे ४.१.२०२० या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. वडिलांच्या आजारपणात श्री. किरण कुलकर्णी यांनी साधनेच्या दृष्टीने केलेले प्रयत्न आणि त्यामुळे त्यांना झालेले लाभ यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.
१. वडिलांचा आजार बळावत जाऊन त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात येणे
‘माझे वडील श्री. भालचंद्र कुलकर्णी (वय ८२ वर्षे) वर्ष २०१९ मध्ये पुष्कळ आजारी पडले. हळूहळू त्यांचा आजार बळावत चालला. आम्ही सर्व जण पुष्कळ प्रयत्न करत होतो; पण त्यांच्यात काही सुधारणा न होता त्यांची प्रकृती खालावत चालली होती. शेवटी डॉक्टरांनीही हात टेकले आणि वडिलांना रुग्णालयातून घरी पाठवले. वडील बेशुद्धावस्थेतच (कोमातच) असतांना आम्ही त्यांना घरी घेऊन आलो.
२. घरातील सर्व मंडळींना ‘वडिलांची सेवा साधना म्हणून करायची आहे’, असे सांगून येईल त्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सर्वांची सिद्धता करून घेणे
त्या वेळी मी माझ्या आईला आणि इतर सर्व मंडळींना एकत्र केले अन् त्यांना साधनेच्या दृष्टीने समजावून सांगितले, ‘‘इथून पुढे आपण ‘बाबांमध्ये देव आहे’, असे समजायचे अन् त्यांची सेवा ‘साधना’ म्हणून करायची. त्यामुळे कदाचित् बाबांच्या साधनेच्या बळावर त्यांची प्रकृती सुधारेल, नाही तर त्यांचे जे प्रारब्ध असेल, त्याप्रमाणे घडेल ! आपण साधक म्हणून या प्रसंगाला सामोरे जाऊ.’’ विशेष म्हणजे त्या दिवसापासून सर्वांना ‘आमचे घर मंदिर आहे’, असे वाटू लागले.
३. सेवेचा दृष्टीकोन निर्माण झाल्याने अतिशय प्रसन्न मनाने आणि नामजपासहित कुटुंबियांनी वडिलांची सेवा-शुश्रूषा करणे
त्यानंतर कसली भीती अथवा त्रास न वाटता अतिशय प्रसन्न मनाने सगळे जण वडिलांची सेवा करू लागले. त्यांना नळीवाटे अन्न भरवतांना, तसेच आयुर्वेदाच्या औषधांचे काढे बनवतांना ‘नामजपासहित कृती कशी होईल ?’, याकडे कुटुंबीय कटाक्षाने पहात होते. या सर्व गोष्टींमुळे माझी आईही मनाने खंबीर झाली. २ – ३ वेळा आम्ही आठवण केल्यानंतर बाबांनी तशा अवस्थेतच ‘ओम, ओऽऽम’ असा उच्चार करून नामजप केला. ही सर्व गुरुकृपाच म्हणावी लागेल ! एरवी अशा प्रसंगी आमची मानसिकता खालावली असती; पण आम्ही स्थिर राहून ‘बाबांची सेवा हीच साधना’, असे समजून सर्व शुश्रूषा करत होतो.
४. वडिलांच्या मृत्यूनंतर ‘या स्थूलदेहातील त्यांचे कार्य संपले असून त्यांचा पुढचा प्रवास चालू झाला’, असा आध्यात्मिक दृष्टीकोन ठेवून नामजप अधिक मनापासून चालू ठेवणे
रुग्णालयातून घरी आणल्यानंतर १५ दिवसांनी, म्हणजे ४.१.२०२० या दिवशी बाबा देवलोकी गेले. या सर्व परिस्थितीत आमची सर्वांची मने इतकी स्थिर झाली होती की, आम्ही ‘बाबा गेले’, याकडे आध्यात्मिक दृष्टीने पाहू लागलो. त्या वेळी आम्ही सर्वांनी ‘वडिलांचे या स्थूलदेहातील कार्य संपले आणि आता त्यांचा पुढचा प्रवास चालू झाला’, असा दृष्टीकोन ठेवला. त्या वेळी आम्ही सर्वांनी नामजप अधिक मनापासून चालू ठेवला. विशेष म्हणजे वडिलांच्या पिंडदानाच्या वेळी विधीच्या जागेला एक प्रदक्षिणा घालून कावळा वडिलांच्या पिंडाला अगदी सहज शिवला. हा संकेत ‘त्यांना मुक्ती मिळाली’, हे दर्शवणाराच होता.
अशा प्रकारे ‘नामजप आणि साधना यांद्वारे मन अन् चित्त शुद्ध करण्याचे आमचे प्रयत्न योग्य प्रकारे चालू आहेत’, हे आम्हाला वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, तसेच शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा सर्व स्तरांवर अनुभवता आले.
‘आम्हा सर्व कुटुंबियांवर गुरुकृपा व्हावी अन् आमची साधना आणखी चांगल्या प्रकारे व्हावी’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’
– श्री. किरण भालचंद्र कुलकर्णी, शिवसेना शहरप्रमुख, कागल, जिल्हा कोल्हापूर. (२६.३.२०२०)
|