पितरांच्या चरणी साधिकेने अर्पण केलेले पितृअष्टक !

‘मला एका जिज्ञासूने पुढील ‘पितृअष्टक’ पाठवले. हे अष्टक वाचत असतांना पितरांच्या प्रतीचा कृतज्ञताभाव जागृत होण्यास साहाय्य होते. सध्या पितृपक्ष चालू आहे. ‘सर्व साधकांच्या पितरांना पुढची गती मिळून त्यांनी आम्हा साधकांना आशीर्वाद देऊन आमच्या साधनेत साहाय्य करावे’, अशी पितरांना विनम्रभावाने प्रार्थना करते आणि हे ‘पितृअष्टक’ पितरदेवांच्या चरणी कृतज्ञता भावसुमनांजलीच्या रूपाने अर्पण करत आहे.

पितृअष्टक

कु. मधुरा भोसले

‘जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला ।
पुढे वारसा हा सदा वाढवला ।।

नम्रतेने स्मरतो त्या पितरांना ।
साष्टांग नमस्कार त्या पूर्वजांना ।। १ ।।

इथे मान सन्मान सारा मिळाला ।
पुढे मार्ग तो सदा दाखवला ।।

कृपा हीच सारी केली तयांना ।
साष्टांग नमस्कार त्या पूर्वजांना ।। २ ।।

सदा गती मिळो आमच्या पितरांना ।
विनंती हीच माझी त्रिदेवांना ।।

माझ्या कृती कर्माने मिळो मोक्ष त्यांना ।
साष्टांग नमस्कार त्या पूर्वजांना ।। ३ ।।

कर जोडून करते प्रार्थना तयांना ।
अग्नि, वरुण, वायु आदी देवतांना ।।

सदा साहाय्य देऊनी उद्धरी पितरांना ।
साष्टांग नमस्कार त्या पूर्वजांना ।। ४ ।।

वसु, रुद्र आणि आदित्य (टीप १) स्वरूप पितरांना ।
सप्तगोत्रे (टीप २) आणि अनेक कुळ यांना ।।

मुक्तीमार्ग द्यावा उद्धरण्या त्यांना ।
साष्टांग नमस्कार त्या पूर्वजांना ।। ५ ।।

करूनी सिद्धता भोजनाची तयांना ।
पक्वान्ने आवडीने बनवून नाना ।।

सदा मिळो तृप्ती आमच्या पितरांना ।
साष्टांग नमस्कार त्या पूर्वजांना ।। ६ ।।

मनोभावे पुजूनी तीळ-यवाने ।
विप्रास (टीप ३) देऊन दक्षिणा त्वरेने ।।

आशिष द्यावा आम्हा सकलांना ।
साष्टांग नमस्कार त्या पूर्वजांना ।। ७ ।।

सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा ।
न्यून काही रहाता क्षमा करा ना ।।

गोड मानूनी घ्यावे सेवाव्रतांना ।
साष्टांग नमस्कार त्या पूर्वजांना ।। ८ ।।’

टीप १ – वसु, रुद आणि आदित्य : श्राद्धाच्या वेळी पितरांची वसु, रुद आणि आदित्य या तीन गटांमध्ये गणना केली जाते.

टीप २ – सप्तगोत्रे : एका मतानुसार ‘कश्यप, गौतम, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, जमदग्नी आणि वसिष्ठ’ तर दुसर्‍या मतानुसार ‘ भृगु, मरीचि, अत्रि, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वसिष्ठ’ या धर्मव्यवस्था पहाणार्‍या सप्तर्षींपासून निर्माण झालेल्या प्रमुख ७ गोत्रांना ‘सप्तगोत्र’ असे संबोधले आहे.

टीप ३ – विप्रास : ब्राह्मणांना

– संग्राहक : कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.९.२०२१)