अमेरिकेतील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पुढाकाराने तेथील राज्ये ऑक्टोबर ‘हिंदु वारसा मास’ म्हणून साजरा करणार !
हिंदु धर्माचे अमेरिकेच्या प्रगतीमध्ये बहुमूल्य योगदान ! – विविध राज्यांचे राज्यपाल
|
ह्युस्टन (टेक्सास, अमेरिका) – अमेरिकेच्या टेक्सास, फ्लॉरिडा, न्यू जर्सी, ओहायो आणि मॅसेच्युसेट्स यांच्यासह अनेक राज्यांनी ऑक्टोबरला ‘हिंदु वारसा मास’ म्हणून घोषित केले आहे. या राज्यांच्या राज्यपालांनी एक लेखी निवेदन प्रसिद्ध केेले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हिंदु धर्माने त्याचा अद्वितीय इतिहास आणि वारसा यांच्या माध्यमातून अमेरिकेसाठी ‘बहुमूल्य योगदान’ दिले आहे.
अमेरिकेतील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ऑक्टोबरमध्ये ‘हिंदु वारसा मास’ म्हणून साजरा करण्याची घोेषणा केली होती. त्यानंतर त्याच्या समर्थनार्थ विविध राज्यांचे राज्यपाल आणि सिनेटर (खासदार) यांनी एक लेखी निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, ‘सेवेच्या माध्यमातून हिंदु समुदायाने स्वत:ला अधिक समृद्ध केले आहे. त्यांनी जगातील सहस्रो अनुयायांच्या जीवनामध्ये सुधारणा आणि प्रेरणा निर्माण केली आहे. तसेच हिंदु धर्माने त्याचा अद्वितीय इतिहास आणि वारसा यांच्या माध्यमांतून राज्ये अन् अमेरिका यांच्या प्रगतीमध्ये बहुमूल्य योगदान दिले आहे.’
The proclamations came after various Hindu organizations in the #US announced the addition of another major festival, an entire month of festivals, in October as the #HinduHeritageMonth.https://t.co/nmjUaHZNuB
— India TV (@indiatvnews) September 25, 2021
काही दिवसांपूर्वी ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (जागतिक स्तरावर हिंदुत्वाचे उच्चाटन) ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद झाली. या परिषदेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर हिंदुत्वाची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न झाला होता. या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये लगेचच ऑक्टोबर हा ‘हिंदु वारसा मास’ म्हणून साजरा करण्याची घोेषणा करण्यात आली. या संपकल्पनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
‘अमेरिकेच्या बायडेन सरकारने ऑक्टोबरला औपचारिकरित्या ‘हिंदु वारसा मास’ घोषित करावे’, अशी अमेरिकेतील हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अपेक्षा आहे. यासंदर्भात तेथील हिंदुत्वनिष्ठ समूहाने अभियानही चालू केले आहे. ‘विश्व हिंदु परिषद ऑफ अमेरिका’चे अध्यक्ष अजय शहा म्हणाले, ‘‘सनातन वैदिक धर्माविषयी फार थोड्या लोकांना माहिती आहे, याचे मला आश्चर्य वाटते. त्यामुळे आपले तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्र यांविषयी जगाला जागृत करण्याची वेळ आली आहे. ऑक्टोबरला ‘हिंदु वारसा मास’ घोषित करण्यात यावे, यासाठी जुलैमध्ये विश्व हिंदु परिषद ऑफ अमेरिकेसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी अमेरिकेच्या राज्य सरकारांना २० हून अधिक पत्रे पाठवली होती.’’
‘विश्व हिंदु परिषद ऑफ अमेरिका’चे उपाध्यक्ष संजय कौल म्हणाले, ‘‘हिंदु वारसा आणि संस्कृती सहस्रो वर्षे पुरातन आहे. त्यामुळे तिची महती जगासमोर ठेवणे, हे आपले कर्तव्य आहे. यामुळे आपली पुढील पिढी या संस्कृतीविषयी अभिमान बाळगेल.’’