बांधकाम व्यावसायिकाकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद !
पुणे – बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध जनहित याचिका प्रविष्ट करून ती मागे घेण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने चौघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी निखिल गोखले यांनी तक्रार नोंदवली असून हा प्रकार एप्रिल २०१५ ते जुलै २०१९ या कालावधीत शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात घडला. गोखले यांचे ‘शशीबिंदू कन्स्ट्रक्शन’ नावाचे बांधकाम आस्थापन आहे. त्यांच्या बोपोडी येथील बांधकाम प्रकल्पाची अनुमती चुकीची असल्याचा आरोप करून चौघांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली होती. ही याचिका मागे घेण्यासाठी ऑगस्ट २०१८ मध्ये गोखले यांना शिवीगाळ करून त्यांना आणि त्यांच्या आस्थापनाच्या संचालकांना जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली होती. राजेश बजाज, कुरेशी, अशोक जाधव, बापू शिंदे अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत.