पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटकमध्ये राबवण्यात येत असलेल्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती आणि समाजातून मिळालेला प्रतिसाद !

सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटकमध्ये राबवण्यात येत असलेल्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या (ग्रंथ अभियाना’च्या) वेळी साधकांना आलेल्या अनुभूती आणि समाजातून मिळालेला प्रतिसाद !

कर्नाटक राज्यात १.९.२०२१ ते ३०.९.२०२१ या काळात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान (ग्रंथ अभियान)’ राबवण्यात येत आहे. या अभियानाला आरंभ करतांना सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी साधकांना भावपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे महत्त्व सांगितले आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात महान योगदान देणारे हे दिव्य अन् चैतन्यदायी ग्रंथ समाजात घरोघरी पोचवण्याचे महत्त्वही लक्षात आणून दिले. यातून ‘साधकांची साधना कशी होणार आहे ?’, याविषयीही त्यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कर्नाटकातील साधकांना स्फूर्ती मिळून त्यांनी उत्साहाने प्रयत्न चालू केले.

या अभियानाच्या पहिल्या पंधरा दिवसांत दक्षिण कन्नड, बेळगाव आणि धारवाड या जिल्ह्यांतील साधकांनी केलेले प्रयत्न, त्यांना समाजातून मिळालेला प्रतिसाद, तसेच साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

पू. रमानंद गौडा

१. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील साधकांनी केलेले प्रयत्न

सौ. वाणी आचार्य, मंगळुरू

‘ग्रंथ कुणाला वितरित करावेत ?’, याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर एकेक नाव डोळ्यांसमोर येणे आणि गुरुदेव अन् पू. रमानंदअण्णा यांच्या संकल्पाने अनेक ग्रंथ-लघुग्रंथ यांचे वितरण होणे : ‘पू. रमानंद गौडा यांनी ग्रंथ अभियानाविषयी मार्गदर्शन केल्यावर ‘ग्रंथ कुणाला वितरित करावेत ?’, याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना होऊ लागली. मी गुरुदेवांना संपूर्णपणे शरण गेले आणि रात्री झोपेतून जाग आल्यावर एकेक नाव माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागले. तेव्हा पू. रमानंदअण्णांनी सांगितलेले ‘प्रत्येक क्षणी ग्रंथ कुणाला द्यायचे, याचे तळमळीने चिंतन करायचे’, हे वाक्य मला आठवत होते.

नंतर जिज्ञासूंना संपर्क करतांना त्यांच्या आवडीचा अभ्यास करून आम्ही त्यांना ग्रंथांविषयी सांगत होतो. एकाला ग्रंथ घेण्याविषयी विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘मी हे ग्रंथ कुणाला देऊ ?’’ तेव्हा मला आतूनच सुचले आणि मी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही भजनाला जाता. नवरात्रीत भजनाला येणार्‍या व्यक्तींना हे ग्रंथ द्या. तुम्हाला ग्रंथांतील ज्ञान १०० घरांत पोचवून गुरुसेवा करण्याची  संधी आहे.’’ मी असे सांगताच त्यांना ते पटले आणि त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटली. खरेतर आम्ही २०० मोठे ग्रंथ आणि २५० लघुग्रंथ वितरित करण्याचे ध्येय ठरवले होते; परंतु परात्पर गुरु डॉक्टर अन् पू. रमानंदअण्णा यांच्या संकल्पाने २२० मोठे ग्रंथ आणि २७५ लघुग्रंथ यांचे वितरण झाले. अशा प्रकारे ध्येय पूर्ण करून घेणार्‍या गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !’

सौ. सरस्वती नायक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), मंगळुरू

ग्रंथ अभियानाच्या पहिल्याच दिवशी नातेवाइकांना ग्रंथाची माहिती सांगितल्यावर त्यांनी ग्रंथ घेण्यास होकार देणे आणि ‘गुरूंच्या या कार्यात सर्वांना सहभागी करून घेतले पाहिजे’, असे लक्षात येणे : ‘मी पुष्कळ आजारी होते. त्यामुळे ग्रंथ अभियानाची सेवा कशी करायची ?’, असे विचार माझ्या मनात येत होते. ग्रंथ अभियानाच्या पहिल्याच दिवशी मी माझ्या नातेवाइकांना ग्रंथांविषयी माहिती सांगितली. तेव्हा सर्वांनी ग्रंथ घेण्यासाठी होकार दिला. प.पू. गुरुदेवांनीच माझ्याकडून हा प्रयत्न करून घेतला. ‘पू. अण्णांच्या मार्गदर्शनानुसार ही ग्रंथ अभियानाची सेवा अधिकाधिक करून गुरूंच्या या महान कार्यात आपले कुटुंबीय, हितचिंतक, तसेच वर्गणीदार यांना सहभागी करून घेतले पाहिजे’, असे माझ्या लक्षात आले.’

श्री. उपेंद्र आचार्य, मंगळुरू

ग्रंथ अभियानाची सेवा करतांना शारीरिक त्रास न्यून होणे आणि धर्मप्रेमींशी बोलतांना ‘गुरुदेव विचार देत आहेत’, असे जाणवून सेवेच्या कालावधीत गुरुपौर्णिमेसारखे वातावरण अनुभवणे : ‘आमचे स्वभावदोष आणि अहं नष्ट करण्यासाठी गुरुदेवांनीच सेवेची ही संधी दिली आहे’, असा विचार येऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. सेवा करतांना एका धर्मप्रेमीच्या माध्यमातून अनेक धर्मप्रेमींना भेटता आले आणि प्रत्येकाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ही सेवा करतांना माझे शारीरिक त्रास न्यून होत होते. धर्मप्रेमींशी बोलतांना ‘गुरुदेवच मला विचार देत आहेत’, असे मला जाणवायचे. या सेवेच्या कालावधीत प्रतिदिन गुरुपौर्णिमा असल्यासारखे वातावरण निर्माण होत होते.’

एम्. हरीश, उजिरे

हितचिंतक, स्नेही, नातेवाईक आदी नावांची सूची तयार करून ‘प्रतिदिन समाजात ५० – १०० ग्रंथ वितरित करायचे’, असे ध्येय ठेवणे आणि या सेवेतून पुष्कळ आनंद मिळणे : ‘पू. अण्णांनी ग्रंथ अभियानाचे महत्त्व सांगितल्यावर मला ‘अधिकाधिक सेवा करावी’, असे वाटले. मी गुरुचरणी शरणागतभावाने प्रार्थना केली, ‘गुरुदेव, मला काहीच समजत नाही. तुम्हीच माझ्याकडून उत्तम रीतीने सेवा करवून घ्या.’ नंतर गुरुदेवांनी मला सेवेचे विचार दिले आणि मी माझे सर्व हितचिंतक, स्नेही, नातेवाईक, तसेच माझे सहकारी या सर्वांच्या नावांची सूची सिद्ध केली. मी ‘प्रतिदिन ५० – १०० ग्रंथ समाजात वितरित करायचे’, असे ध्येय ठेवले आणि त्यानुसार प्रयत्न चालू केले. या सेवेतून मला पुष्कळ आनंद मिळाला. आता माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्नही चांगल्या प्रकारे होत आहेत. माझ्यातील संकुचित विचार जाऊन व्यापकता वाढली आहे, तसेच माझा आत्मविश्वासही वाढला आहे.’

२. बेळगाव येथील साधकांना आलेल्या अनुभूती आणि समाजातून मिळालेला प्रतिसाद !

सौ. अश्विनी चौगुले (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) आणि सौ. अरुणा कायस्थ (आध्यात्मिक पातळी ६० टक्के)

ग्रंथांविषयी माहिती सांगतांना हितचिंतकांना सुगंध येणे,  गुरुदेवांच्या अस्तित्वाची जाणीव होणे आणि हितचिंतकांनी सर्व ग्रंथ विकत घेणे : ‘मी आणि एक सहसाधिका एका हितचिंतकांना ग्रंथांविषयी सांगत होतो. त्या वेळी आम्ही कोणतेही सुगंधी अत्तर लावले नसून त्यांना अकस्मात् सुगंध येऊ लागला. त्यांनी आम्हाला विचारले, ‘‘मला चांगला सुगंध येत आहे. तुम्ही अत्तर लावून आला आहात का ?’’ त्यांनी २ – ३ वेळा आम्हाला असे विचारले. त्या वेळी आम्हाला गुरुदेवांच्या अस्तित्वाची जाणीव होऊन पुष्कळ कृतज्ञता वाटली. आम्ही त्यांना ग्रंथांची माहिती सांगून काही ग्रंथ दाखवले. आम्ही त्यांना जे ग्रंथ दाखवले, ‘ते सर्व ग्रंथ मला हवे आहेत’, असे सांगून त्यांनी ते सर्व ग्रंथ विकत घेतले.’

सौ. लता बडिगेर, रायबाग (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)

सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी प्रार्थना करताच स्वतःभोवती पिवळे वलय निर्माण होऊन चंदनाचा सुगंध येणे : ‘मी सेवेला प्रारंभ करण्याआधी प्रार्थना करताच माझ्या भोवती पिवळे वलय निर्माण झाले आणि मला चंदनाचा सुगंध आला. त्यामुळे पूर्ण दिवस कोणताही त्रास न होता मला आनंद आणि उत्साह जाणवत होता.’

श्री. सिद्धेश्वर देसाई, रायबाग

श्री जय हनुमान देवस्थानाच्या कळसारोहण कार्यक्रमासाठी जमलेल्या भक्तवृंदाला पू. श्री महंत देव यांनी सनातनचे ग्रंथ दाखवून ‘ग्रंथांचा लाभ करून घ्यावा’, असे आवाहन करणे : ‘बेळगाव जिल्ह्यातील रायबाग या गावात श्री जय हनुमान देवस्थानाच्या कळसरोहणाचा कार्यक्रम होता. त्या वेळी पू. श्री महंत देवांनी आपल्या अमृतहस्तांनी तिथे जमलेल्या भक्तवृंदाला सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ दाखवून आणि त्यांची माहिती देऊन ‘सर्वांनी या ग्रंथ अभियानाचा सदुपयोग करून घ्यावा’, असे आवाहन केले. या कार्यक्रमाला ४५० भक्त उपस्थित होते. या भक्तांनी ग्रंथांचा लाभ करून घेतला.’

३. धारवाड

३ अ. साधकांनी केलेले भावपूर्ण प्रयत्न : वयस्कर आणि आजारी असलेल्या साधकांनीही या ग्रंथ प्रसार अभियानात भाव ठेवून प्रयत्न केले. त्यामुळे ग्रंथ वितरण सेवेत उत्तम फलनिष्पत्ती मिळाली.

१. हुब्बळ्ळीच्या श्रीमती राधा नायक (वय ७५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आजारी आहेत, तरीही त्यांनी भावपूर्ण आणि तळमळीने प्रयत्न केले. त्यांनी घरातूनच भ्रमणभाषवरून परिचितांना संपर्क करून ही सेवा केली.

२. धारवाड येथील श्रीमती शशिकला हरिहरमठ (वय ६५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांना संधीवाताचा पुष्कळ त्रास आहे. आधुनिक वैद्यांनी त्यांना त्यांच्या डोळ्यांचे शस्त्रकर्म करून घेण्यास सांगितले आहे. असे असूनही ग्रंथसेवा करता यावी, यासाठी त्यांनी आपले शस्त्रकर्म पुढे ढकलले आणि सेवा उत्तम रीतीने केली.

३ आ. समाजातून मिळालेला प्रतिसाद !

१. डॉ. उमेश नागलोतिमठ विदेशात रहातात. ग्रंथ अभियानाविषयी माहिती सांगितल्यावर त्यांनी लगेच अनेक इंग्रजी ग्रंथांची मागणी केली. त्याचप्रमाणे देवस्थानांना देण्यासाठी लघुग्रंथांची मागणीही केली.

२. साधक धारवाडच्या एका आमदारांना भेटायला गेले असता ते नसल्याने त्यांच्या पत्नीची भेट झाली. आमदारांच्या पत्नीने ‘सनातन संस्थेचा उद्देश, तसेच ग्रंथांचे महत्त्व’ समजून घेऊन ‘शक्य ते सर्व साहाय्य करण्याचा मी प्रयत्न करीन’, असे सांगितले. सनातनचे ग्रंथ पाहून ‘हे सर्व ग्रंथ आताच वाचावेत’, असे मला वाटते’, असे उद्गार काढून त्यांनी स्वतःसाठी कन्नड ग्रंथांच्या संचाची मागणी केली. (२४.९.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक