सनातनचे ग्रंथ : केवळ ज्ञान नव्हे, तर चैतन्याचे दिव्य भांडार !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

सनातनचे ग्रंथ म्हणजे ईश्वरी चैतन्य, तसेच आनंद आणि शांती यांची अनुभूती देणारे साहित्य आहे. सनातनच्या ग्रंथातील दिव्य ज्ञान समाजापर्यंत पोचण्यासाठी सनातनच्या वतीने भारतभर ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे. सनातनचे ग्रंथ समाजातील प्रत्येक जिज्ञासू, मुमुक्षू आदी जिवांपर्यंत पोचून त्यांनाही या ज्ञानशक्तीचा लाभ व्हावा, हा या अभियानाचा उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर सनातनच्या ग्रंथांची वैशिष्ट्ये सांगणारी माहिती या लेखात दिली आहे. या माहितीचा अभ्यास करून हे अभियान अधिक परिणामकारक राबवण्यास साधकांना साहाय्य होईल.

सनातनच्या ग्रंथाचे मुखपृष्ठ

१. अनुभवसिद्ध ज्ञानातून साकारणारे मौलिक विचारधन !

‘संस्कृती टिकते, ती अनुभवसिद्ध वाङ्मयामुळे ! हे अनुभवाचे बोेल असलेले वाङ्मय पुढील कित्येक पिढ्यांना तारक ठरते. अनुभवसिद्ध साहित्य-संस्कृती ज्यांनी जोपासली, त्यांचे नाव अजरामर झाले आणि ते दीपस्तंभ बनून या जगात मार्गदर्शक ठरले. आद्य शंकराचार्य, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदासस्वामी आदींची चरित्रे आणि वाङ्मय यांत अनुभव ओतप्रोत भरलेला आहे. या विभूतींप्रमाणेच परात्पर गुरु डॉक्टरांचे चरित्र आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ मार्गदर्शक आहेत; कारण संतांनी विविध प्रसंगी शिकवलेले अध्यात्म, अध्यात्म जगतांना स्वतःला आलेले अनुभव, त्या अनुभवांचे केलेले विश्लेषण, प्रयोगशीलतेतून अर्जित केलेले ज्ञान इत्यादींनी ते समृद्ध आहेत. अध्यात्म हे अनुभूतीचे शास्त्र असल्याने बर्‍याचदा अध्यात्मातील नाविन्यपूर्ण सूत्रे देव अनुभूती देऊन शिकवतो. या सूत्रांचाही समावेश ग्रंथांमध्ये असतो.

२. सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा

पू. संदीप आळशी

सनातनची ग्रंथसंपदा सर्वांगस्पर्शी आहे. कर्मकांडांप्रती आस्था असणार्‍यांना धर्मशास्त्र प्रतिपादन करणारे ग्रंथ उपयुक्त ठरतात. उपासनाकांडातील साधकांना भक्तीप्रचूर करणारे ग्रंथ मार्गदर्शक ठरतात. कलेची रुची असणार्‍यांना ‘सात्त्विक कला कशी जोपासावी ?’, याविषयीचा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन शिकायला मिळतो. राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसंबंधीचे ग्रंथ हिंदु समाजाला सर्वदृष्ट्या आदर्श असणारे हिंदु राष्ट्र स्थापण्याविषयी दिशादर्शन करतात. बालसंस्कार, मुलांचा विकास, आयुर्वेद असे जीवनाच्या आणि साधनेच्या प्रत्येक अंगाविषयी व्यापक आणि सखोल मार्गदर्शन करणारे ग्रंथ आहेत.’

३. अध्यात्मातील प्रत्येक गोष्टीविषयी ‘का अन् कसे’ यांची शास्त्रीय उत्तरे !

सध्याच्या विज्ञानयुगातील पिढीला अध्यात्मातील प्रत्येक गोष्टीविषयी ‘का अन् कसे’, हे जाणून घ्यायची जिज्ञासा असते. त्यांना अध्यात्मातील एखाद्या गोष्टीमागील शास्त्र समजावून सांगितले की, त्यांचा अध्यात्मावर लवकर विश्वास बसतो आणि ते साधनेकडे वळतात. यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी आरंभापासूनच प्रत्येक ग्रंथात अध्यात्मशास्त्र सांगण्यावर भर दिला आहे. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.

शिवपिंडीवर बेल वहाण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे पानांचे टोक आपल्या दिशेने करून बेल वहाणे आणि दुसरी पद्धत म्हणजे पानांचे देठ आपल्या दिशेने करून बेल वहाणे. ‘दोन निरनिराळ्या पद्धती का ?’, असा प्रश्न जिज्ञासूंच्या मनात येऊ शकतो. यामागील शास्त्र याप्रमाणे आहे – बेलाचे पान तारक शिवतत्त्वाचे वाहक आहे, तर बेलाच्या पानाचे देठ मारक शिवतत्त्वाचे वाहक आहे. सर्वसामान्य उपासकांची प्रकृती तारक स्वरूपाची असल्याने शिवाची तारक उपासना ही त्यांच्या प्रकृतीला जुळणारी आणि त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीस पूरक ठरणारी असते. अशांनी शिवाच्या तारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी पानांचे देठ पिंडीकडे आणि टोक स्वतःकडे करून बेलपत्र वहावे. याउलट शाक्तपंथीय (शक्तीची उपासना करणारे) शिवाच्या मारक रूपाची उपासना करतात. अशा उपासकांनी शिवाच्या मारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी बेलाच्या पानांचे टोक देवाकडे आणि देठ स्वतःकडे करून बेलपत्र वहावे.’

– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक (२३.४.२०१७)

सनातनचे ग्रंथ म्हणजे आधुनिक काळातील ‘गीता’ !

‘श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथाचे वैशिष्ट्य काय ? ‘सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।’, म्हणजे ‘सर्व प्रकृतीधर्म, षड्रिपू अन् अहं यांचा त्याग करून एकट्या मला शरण ये’, असा उपदेश करणारा गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला भगवंताच्या प्राप्तीचे रहस्य आणि मार्ग दर्शवतो. त्याचसह ‘सगेसोयरे, गुरुजन, पितामह इत्यादी समोर उभे ठाकले, तरी ते अधर्माच्या बाजूने असल्याने त्यांचा वध करणे, हे धर्मपालनच आहे’; म्हणून ‘उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः’, म्हणजे ‘ऊठ अर्जुना, धर्मयुद्धास सज्ज हो’, असेही निक्षून बजावतो. भगवंताची ही ‘गीता’ म्हणजे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा आदर्श समन्वयच आहे.

समाज अध्यात्ममार्गी, धर्माचरणी बनला, तर नीतीमत्ता, चारित्र्यशीलता, बंधूभाव, कर्तव्यदक्षता आदी गुणांचा त्याच्यात विकास होऊन सामाजिक स्थैर्य लाभते. त्याचसह अन्याय, अधर्म आदींच्या विरुद्ध लढलो, तरच राष्ट्रीय जीवनात भ्रष्टाचार, गुंडगिरी, सामाजिक विषमता यांसारख्या दुर्गुणांवर चाप बसून राष्ट्र्र सुरक्षित आणि सुव्यवस्थित रहाते. यासाठीच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा सुयोग्य समन्वय असणे आवश्यकच असते. ‘गीता’ या ग्रंथाप्रमाणेच सनातनचे ग्रंथ हे आधुनिक काळाला आवश्यक असणारे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांची शिकवण देत आहेत.’

– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक (२३.४.२०१७)

सनातनच्या ग्रंथांचे महत्त्व !

पू. रमानंद गौडा

१. ‘श्रीमद्भगवद्गीता, महाभारत आदी धर्मग्रंथ ईश्वरी वाणीने साकार झाले आहेत; म्हणून त्यात चैतन्य आहे, तसेच सनातनचे ग्रंथही ईश्वरी संकल्पाने साकार झाले आहेत. वेदासमान असलेले हे ग्रंथ स्वयंभू चैतन्याचे स्रोत असून त्यांचे अध्ययन करणार्‍यांनी ग्रंथांतून सांगितलेले मार्गदर्शन कृतीत आणले, तर ते साधक आणि शिष्य पुढे संतही होऊ शकतात.

२. या ग्रंथांमुळे घरात सात्त्विक स्पंदने निर्माण होऊन वास्तूशुद्धीही होते.

३. या ग्रंथांच्या अध्ययनाने अंतर्मनात साधनेचा संस्कार होतो. यांचे अध्ययन करून ते कृतीत आणणे, ही साधनाच आहे. यामुळे साधकाचा उद्धार होणार आहे.

४. शाळेत असतांना ‘ग्रंथच गुरु आहेत’, असे शिकत होतो. तेव्हा मला याचा अर्थ कळला नाही. सनातनचा ग्रंथ वाचल्यावर त्यातून ज्ञान मिळाले आणि ‘ग्रंथच गुरु आहेत’, याची प्रकर्षाने जाणीव झाली.

५. सनातनचे ग्रंथ ज्ञानभंडार आहेत, ज्ञानाचे सागर आहेत; म्हणून आमचे गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले हे ज्ञानगुरु आहेत. ‘ज्ञान कृतीत आणले, आचरणात आणले, तर आपल्याला मोक्षप्राप्ती होईल’, हे आपल्याला प.पू. गुरुदेवांनीच शिकवले आहे. म्हणजे तेच आम्हा साधकांना मोक्षापर्यंत नेत आहेत. तेच मोक्षगुरु आहेत.’

– पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था, कर्नाटक. (२.९.२०२१)


‘पू. रमानंद गौडा यांच्यामुळे मला सनातनच्या ग्रंथांचे महत्त्व कळले. यासाठी मी त्यांचा आभारी आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातनचे आध्यात्मिक ग्रंथ मोठ्या संख्येने खरेदी करणार्‍यांची जिल्हांतर्गत नोंद ठेवून त्यांच्यापर्यंत सनातनचे नूतन प्रकाशित ग्रंथ पोचवण्याची व्यवस्था करा !

जिल्हासेवकांना सूचना !

सध्या सर्वत्र सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत सनातनच्या ग्रंथांचे वितरण केले जात आहे. या अभियानाच्या अंतर्गत ग्रंथ खरेदी करणारे काही जिज्ञासू मोठ्या संख्येने ग्रंथ खरेदी करत असल्याचे लक्षात आले आहे. एकाच वेळी १० किंवा त्यापेक्षा अधिक ग्रंथांची खरेदी करणार्‍या अशा जिज्ञासूंची जिल्ह्यामध्ये स्वतंत्र नोंद ठेवावी. तसेच जेव्हा सनातनचा एखादा नूतन ग्रंथ प्रकाशित होईल, तेव्हा त्यांना संपर्क करून तो नूतन ग्रंथ दाखवण्याची व्यवस्था करावी. एखाद्या विषयाचीची आवड असल्यास ते नूतन ग्रंथ खरेदी करू शकतील.

ग्रंथ घेणार्‍या अशा जिज्ञासूंची जिल्हास्तरावर नोंद करण्याची पद्धत केंद्र आणि जिल्हा अशी द्विस्तरावर असावी. यामुळे नूतन ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर केंद्रस्तरीय साधक अशा जिज्ञासूंना संपर्क करतील आणि जिल्हास्तरीय साधक ‘अशा जिज्ञासूंपर्यंत नूतन ग्रंथ पोचला कि नाही’, याचा आढावा घेऊ शकतील.

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’त सक्रीय सहभागी होऊन ईशकृपा संपादन करा !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना विनंती !

देशभरात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या माध्यमातून सनातनचे ग्रंथ अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्यासाठी साधक प्रयत्नशील आहेत. धर्मप्रसाराच्या कार्यात सहभाग म्हणजे ईश्वरी कृपा संपादन करण्याचा सोपान ! म्हणूनच या अभियानात आपणही यथाशक्ती सहभागी व्हा !

यासाठी स्वत: ग्रंथ खरेदी करण्यासह मित्र-आप्तेष्ट आणि इतर परिचित यांनाही ग्रंथांची खरेदी करण्यासह त्यांचा प्रसार करण्यासाठी उद्युक्त करा !

या अभियानात सहभागी होण्यासाठी साहाय्य हवे असल्यास आपल्या परिचयातील साधकांना संपर्क करा !