महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात ‘ॲट्रॉसिटी’ कायद्याच्या धर्तीवर कायदा सिद्ध करा ! – सौ. चित्रा वाघ, भाजप
महिलांवरील वाढते अत्याचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी लज्जास्पद ! – संपादक
मुंबई – महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (ॲट्रॉसिटी कायदा) धर्तीवर कायदा सिद्ध करा, अशी मागणी भाजपच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी केली. २२ सप्टेंबर या दिवशी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याविषयीचे निवेदन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही दिले असल्याचे त्यांनी सांगितले. सौ. चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘महिलांवरील वाढत्या अत्याचाराची चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले उत्तर धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची अन्य राज्यातील घटनांशी तुलना करून मुख्यमंत्र्यांनी सरकार किती असंवेदनशील आहे, हेच दाखवून दिले. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात काय चालू आहे, हे उद्धव ठाकरे यांनी पहावे.’’