सांगली येथील विसावा मंडळाच्या वतीने ५ सहस्रांहून अधिक श्री गणेशमूर्तींचे कृष्णा नदीत विसर्जन !
सांगली, २४ सप्टेंबर (वार्ता.) – गणेशोत्सव कालावधीत भाविक, तसेच गणेशोत्सव मंडळे यांनी कृष्णा नदीत विसर्जित केलेल्या आणि पाणी अल्प झाल्यावर नदीच्या बाहेर आलेल्या ५ सहस्रांहून अधिक श्री गणेशमूर्ती गावभाग येथील विसावा मंडळाचे कार्यकर्ते अन् गणेशभक्त यांनी परत नदीत विसर्जित केल्या. सरकारी घाट, माई घाट आणि विष्णु घाट अशा तिन्ही घाटांवर ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सर्वश्री संजय चव्हाण, हरिदास कालिदास, महेश खाडिलकर, जितेंद्र कुष्टे, शिरीश चव्हाण, प्रथमेश वैद्य, शुभम चव्हाण, संजु मद्रासी, अनिकेत कुलकर्णी, अजिंक्य कुलकर्णी यांसह अन्य सहभागी झाले होते. (निधर्मी राज्यप्रणालीत हिंदूंच्या सणांकडे प्रशासनाचे कसे दुर्लक्ष होते, याचेच हे उदाहरण आहे ! वास्तविक श्री गणेशमूर्ती विसर्जन कालावधीत कोयना धरणातून पुरेसे पाणी सोडणे, भाविकांना विसर्जनासाठी योग्य ते नियोजन करून देणे या कृती प्रशासनाने करणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रतिवर्षी पाणी अल्प झाल्याने होणार्या श्री गणेशमूर्ती विटंबनेसाठी प्रशासनही तेवढेच उत्तरदायी आहे ! – संपादक)
वरील छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्या धार्मिक भावना दुखावणे हा हेतू नसून वस्तूस्थिती लक्षात यावी, या दृष्टीने ती घेतलेले आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.
या संदर्भात विसावा मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय चव्हाण म्हणाले, ‘‘वास्तविक कृष्णा नदीचे पाणी अल्प झाल्यावर प्रत्येक वर्षी ही समस्या उद्भवते; मात्र प्रशासनाचे या संदर्भात कोणतेही नियोजन दिसून येत नाही. नदीत खोल पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन होण्यासाठी नावा (होड्या) उपलब्ध करून देणे, कोयना धरणातून पाणी सोडण्याचा योग्य समन्वय, अशा गोष्टी प्राधान्याने करणे आवश्यक आहे. ’’
कृष्णा नदीत शेरीनाल्याचे सांडपाणी मिसळून होणार्या प्रदूषणाकडे सर्वपक्षीय दुर्लक्ष ! – संजय चव्हाणसर्वपक्षीय शासनकर्ते आणि काही कथित पर्यावरणप्रेमी यांना गणेशोत्सवकाळात केवळ मूर्ती विसर्जनामुळे कृष्णा नदीचे प्रदूषण होते, असे वाटते; मात्र वर्षभर कृष्णा नदीत शेरीनाल्याचे पाणी मिसळून जे प्रदूषण होते, त्याकडे पहाण्यासाठी कुणालाही वेळ नाही, हे दुर्दैव आहे. |