पुणे येथील १४ जणांच्या टोळीने धारदार शस्त्रांसह रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली !
पुणे शहरातील गुंडांचे वाढते वर्चस्व हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. सामान्य जनतेला दहशतीच्या सावटाखाली जगावे लागणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पद आहे. निष्पाप जनतेला नव्हे, तर गुन्हेगारांना दहशत वाटेल अशी जरब पोलीस कधी निर्माण करणार ? – संपादक
पुणे, २४ सप्टेंबर – येरवडा येथील प्रतीकनगर येथे २ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून १४ जणांच्या टोळीने २२ सप्टेंबरला रात्री धारदार शस्त्रांसह रस्त्यावरील १२ दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली. या प्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून पसार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. दहशत माजवणारे आरोपी विश्रांतवाडी, लोहगाव, दत्तवाडी आणि कात्रज भागांतील आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर दहशत माजवणे आणि हत्येच्या प्रयत्न हे गुन्हे नोंद केले आहेत. या प्रकरणी अब्दुल सय्यद यांनी तक्रार दिली आहे.