अमिताभ बच्चन यांनी पानमसाल्याच्या विज्ञापनातून त्यांचा सहभाग काढून घ्यावा ! – ‘राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन संस्थे’चे बच्चन यांना आवाहन
|
पणजी – प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ते करत असलेल्या ‘कमला पसंत’ पानमसाल्याच्या विज्ञापनातून त्यांचा सहभाग काढून घ्यावा, असे आवाहन ‘राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन संस्थे’ने (‘नोट’ने) केले आहे. या विज्ञापनाच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थांचा प्रचार होत असल्याने त्याचा युवा पिढीवर विपरीत परिणाम होत असतो. पानमसाला हा तंबाखूइतकाच आरोग्यासाठी घातक आहे. युवा पिढीला व्यसनाधीन होण्यापासून रोखण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी तबांखूविरोधी आणि पानमसालाविरोधी चळवळीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन ‘नोट’चे अध्यक्ष तथा प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी केले आहे.
अमिताभ बच्चन यांना लिहिलेल्या पत्रात डॉ. साळकर यांनी म्हटले आहे की, तंबाखू आणि पानमसाला यांच्या सेवनाने युवा पिढीचे आरोग्य बिघडते. तंबाखू आणि पानमसाला यांच्या सेवनाने कर्करोग, हृदयरोग, क्षयरोग यांसारखे रोग जडतात. भारत सरकारच्या तंबाखूविरोधी कार्यक्रमामुळे आणि काही स्वयंसेवी संघटनांच्या प्रयत्नांमुळे तंबाखू सेवनाचे प्रमाण नियंत्रणात आले आहे; मात्र अशा विज्ञापनांमुळे हे प्रयत्न खुंटले जातात. आपले हे विज्ञापन पानमसाल्याचा प्रसार करण्यासमवेतच लहान मुलांना पानमसाल्याचे सेवन करण्यास प्रेरित करत आहे.