वास्को पोलिसांकडून आयपीएल् क्रिकेट स्पर्धेचा सट्टाबाजार उघडकीस : ६ जणांना अटक
मुरगाव, २४ सप्टेंबर (वार्ता.) – वास्को पोलिसांनी २३ सप्टेंबरच्या मध्यरात्री वाडे येथील सुशिला सी विंड्स या संकुलातील सदनिकेवर धाड टाकून देशात सध्या चालू असलेल्या आयपीएल् क्रिकेट स्पर्धेचा आंतरराज्यीय सट्टाबाजार उघडकीस आणला. या वेळी नागपूर येथील ५ जण आणि राजस्थान येथील १, अशा ६ जणांना अटक करण्यात आली. त्याचसमवेत सट्टाबाजारासाठी वापरण्यास येत असलेले २ लॅपटॉप, अनेक भ्रमणभाष संच, काही कागदपत्रे आदी साहित्य कह्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी १९ सप्टेंबरपासून सट्टाबाजार चालू होता. या टोळीला वापरण्यासाठी ज्या व्यक्तीने सदनिका (फ्लॅट) भाडेतत्त्वावर दिला, ती व्यक्ती वास्को येथील असून तीही या सट्टाबाजार टोळीशी संलग्न आहे. तिलाही लवकरच अटक करण्यात येईल. अटक करण्यात आलेल्या सर्वांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.