कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर अंत्यविधीच्या वेळी जाणवलेली सूत्रे
कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया यांचा मुलगा श्री. आनंद आणि जाऊबाई सौ. विद्या जाखोटिया यांना त्यांच्या निधनापूर्वी आणि अंत्यविधीच्या वेळी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
श्री. आनंद जाखोटिया (कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया यांचा मुलगा, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल
१. कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया यांच्या निधनापूर्वी
१ अ. ‘साधकांचे गुरुचरणांशी राहून प्रारब्ध कसे संपते ?’, असे सांगून देवाने जणू सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या माध्यमातून साधकाला आईच्या निधनाची दिलेली पूर्वसूचना ! : ‘मी सेवेसाठी देहली येथील सनातनच्या सेवाकेंद्रात रहातो. माझ्या आईच्या निधनाच्या दिवशी मी देहली येथेच होतो. त्या दिवशी सकाळी मी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना सहजच आईच्या त्रासांविषयी सांगितले. त्या वेळी त्यांनी ‘साधकांचे गुरुचरणांशी राहून प्रारब्ध कसे संपते आणि गुरु कसे बळ देतात’, यांविषयी मला सांगितले. त्यानंतर थोड्या वेळाने मला आईच्या निधनाची वार्ता समजली. त्या वेळी ‘सद्गुरु काकांच्या माध्यमातून देवाने एक प्रकारे या घटनेची पूर्वसूचनाच दिली होती’, असे मला वाटले.
२. निधनानंतर
२ अ. अंत्यविधीची सर्व सिद्धता अत्यंत व्यवस्थितपणे केलेली पाहून साधकाच्या नातेवाइकांनी कौतुक करणे : मी अंत्यविधीसाठी मुंबई विमानतळावर उतरून मुंबईहून पनवेल येथे आलो. आश्रमातील साधकांनी अंत्यदर्शनाची सर्व सिद्धता अत्यंत भावपूर्णरित्या केली होती. अंत्यविधींच्या वेळी सेवा करणार्या साधकांनी पांढरे धोतर नेसले होते. ‘आश्रमात अंत्यविधीची सिद्धता अत्यंत व्यवस्थित केली होती. ‘आश्रमात इतके सर्व करतात !’, अशा शब्दांत नातेवाइकांनी त्या वेळी कौतुक केले.’
२ आ. आईचे पार्थिव गाडीत ठेवल्यावर ‘प्रत्यक्ष देवदूतच आईला घ्यायला आले आहेत’, असे नातेवाइकांना जाणवणे : आईचे पार्थिव स्मशानात नेण्यासाठी गाडीत ठेवल्यावर ‘प्रत्यक्ष देवदूतच तिला घ्यायला आले आहेत’, असे आमच्या नातेवाइकांना जाणवले. स्मशानातही अत्यंत चैतन्यमय वातावरण वाटत होते.’
सौ. विद्या जाखोटिया (कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया यांची धाकटी जाऊ, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), पुणे
अंत्यदर्शनाच्या वेळी कै. (सौ.) चंद्ररेखा यांच्या पाया पडतांना पायांचा स्पर्श मऊ जाणवणे : ‘कै. (सौ.) चंद्ररेखा (माझ्या जाऊबाई) यांच्या पाया पडतांना मला त्यांच्या पायांचा स्पर्श अगदी मऊ लागत होता. पूर्वी एकदा मी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांना नमस्कार करतांना जो स्पर्श अनुभवला होता, तसाच स्पर्श मी जीजींच्या पाया पडतांना अनुभवला.’ (२९.६.२०२१)