विशाळगड येथील अतिक्रमण आणि मंदिरांची दुरवस्था यांविषयी विविध ग्रामपंचायतींचे ठराव घेऊ ! – युवराज काटकर, जिल्हाउपप्रमुख, मनसे
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), २३ सप्टेंबर (वार्ता.) – विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती करत असलेल्या कार्यातून प्रेरणा घेऊन आम्ही विशाळगड येथील अतिक्रमण अन् मंदिरांची दुरवस्था यांविषयी विविध ग्रामपंचायतींचे ठराव घेऊ, तसेच ठिकठिकाणी हा विषय पोचवू, असे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपप्रमुख श्री. युवराज काटकर यांनी दिले. समितीचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी श्री. काटकर आणि त्यांचे सहकारी यांना विशाळगडाची सद्यस्थिती, तसेच याविषयी चालू असलेले प्रयत्न याविषयी अवगत केले. यानंतर त्यांनी हे आश्वासन दिले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कोकण, तथा गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून हिंदू समाजावर कशा प्रकारे आर्थिक आणि धार्मिक आक्रमण केले जात आहे, याची माहिती उपस्थितांना दिली. या वेळी कडवे ग्रामपंचायत सदस्य श्री. भरत पाटील, येळाणे ग्रामपंचायत सदस्य श्री. रोहित जांभळे, हिंदुत्वनिष्ठ रमेश पडवळ, श्री. रूपेश वारंगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेश विभुते, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे, सौ. राजश्री तिवारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाच्या बैठकीत ठराव घेऊ ! – भारत गांधी, उपनगराध्यक्ष, मलकापूर
मलकापूर – पक्षाच्या बैठकीत विशाळगडाच्या संदर्भातील ठराव घेऊ, असे मलकापूर नगरपालिका उपनगराध्यक्ष श्री. भारत गांधी यांनी सांगितले. श्री. सुनील घनवट यांनी मलकापूर नगरपालिकेत श्री. गांधी यांनी विशाळगडाच्या विषयाच्या संदर्भात माहिती दिल्यावर त्यांनी हे आश्वासन दिले. या वेळी विरोधी पक्षतेने श्री. बाबासाहेब पाटील, हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश पडवळ उपस्थित होते.
या प्रसंगी श्री. घनवट यांनी मलकापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्री. भारत गांधी यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट दिले.