रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे जांभळी (जिल्हा नगर) येथील महिलेच्या नवजात अर्भकाचा मृत्यू !
-
दुचाकीवरून प्रवास करण्याची ओढावली वेळ !
-
आरोग्य साहाय्य समितीने निवेदन दिल्यावर जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडून चौकशीचे आश्वासन !
प्रशासनाचा निष्काळजीपणा जनतेच्या जिवावर बेतणे संतापजनक ! – संपादक
नगर, २३ सप्टेंबर – नगर जिल्ह्यातील जांभळी येथील गर्भवती असणार्या सौ. रामेश्वरी बाचकर यांना ८ सप्टेंबर या दिवशी प्रसुतीसाठी रुग्णालयात न्यायचे होते; परंतु रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने महिलेला नाईलाजास्तव दुचाकीवरून नगर येथे न्यावे लागले. रुग्णवाहिकेअभावी या गर्भवती महिलेला दुचाकीने खराब रस्त्यावरून प्रवास करावा लागला. प्रसुतीनंतर काही वेळातच सौ. बाचकर यांच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. खरे पहाता ‘राष्ट्रीय आरोग्य अभियाना’अंतर्गत जिल्हा आरोग्य विभागास प्रतीवर्षी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो.
मृत्यूदर अल्प करण्यासाठी सरकारने सर्व जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. असे असतांना रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे गर्भवती महिलेची गैरसोय होणे आणि त्यामुळे तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू होणे, ही गोष्ट आरोग्य विभागाची अक्षम्य निष्क्रीयता दर्शवते. ही गोष्ट अत्यंत गंभीर असून गर्भवती महिलेस वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न होण्यास उत्तरदायी असणार्या सर्व संबंधितांची त्वरित चौकशी व्हावी, दोषींवर तत्परतेने कठोर कारवाई व्हावी, तसेच वेगवेगळ्या समित्यांना मिळालेल्या निधीच्या वापराची चौकशी व्हावी, या मागण्यांचे निवेदन आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने नगर येथील जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. जिल्हाधिकार्यांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी संदीप विष्णु निचित यांनी हे निवेदन स्वीकारले. तसेच जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी आणि जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. यावर जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी ‘संबंधित प्रकरणाची घटनास्थळी जाऊन चौकशी करू’, असे आश्वासन आरोग्य साहाय्य समितीला दिले.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की,
१. प्रजनन आणि बाल आरोग्य योजनेतील ‘जननी सुरक्षा योजने’च्या अंतर्गत गर्भवती महिलांना गावपातळीवर ‘संदर्भ सेवा’ देण्यासाठी निधीची तरतूद आहे. रुग्णवाहिका उपलब्ध नसेल, तर गावातील खासगी वाहनाने गर्भवती महिलेला ‘संदर्भ सेवा’ देता येऊ शकते. त्यासाठी जिल्हास्तरावरून गावागावांत अशी वाहने उपलब्ध करून देणे, तसेच त्या वाहनचालकांचे संपर्क क्रमांक नागरिकांना माहिती होतील, अशा ठिकाणी फलकाद्वारे प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
२. गावपातळीवर ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा, स्वच्छता समिती आदी विभागांना प्रत्येक वर्षी १० सहस्र रुपयांचा निधी मिळतो. प्रत्येक वर्षी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रुग्ण कल्याण समितीला १ लाख रुपयांचा निधी मिळतो. हा निधी केवळ रुग्णांच्या कल्याणासाठी वापरायचा असतो. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रतीवर्षी २५ सहस्र रुपयांचा अबंधित निधी मिळतो. हा सर्व निधी कसा आणि कुठे वापरला जातो ?, याची सखोल चौकशी व्हावी.