वृद्धांचे जीवन सुखी कसे होईल ?
‘वृद्धांच्या समस्यांचा विचार जागतिक पातळीवर होतो आहे. हा विचार पुढे येण्याची कारणे म्हणजे माणसाच्या आर्युमर्यादेची वाढ आणि परिणामतः वृद्धांची वाढलेली संख्या. ज्येष्ठ मंडळी वयाने वाढत आहेत खरी; पण निव्वळ वाढत रहाण्यातच त्यांनी समाधान मानायचे का ? ‘वाढत रहाणे’, हा निसर्गक्रम आहे. वाढवून मिळत असलेले मानवी जीवन संपन्न रसरशीत असे जात आहे का ? हा विचार महत्त्वाचा. ‘मी इतकी वर्षे जगलो’, यातच का माणसाने मोठेपणा मानायचा ? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. वड आणि पिंपळ यांच्या झाडासारखे वाढणे, म्हणजे जीवनाला एकेक वर्षे जोडत रहाणे होय. निव्वळ वर्षे जोडत रहाण्यापेक्षा, ती वर्षे जीवनात चैतन्यमय कशी जातील, वृद्धत्वातही संपन्न जीवन कसे जगता येईल, हा विचार मोलाचा. वृद्धजीवन काय आणि कोणत्याही वयातील जीवन काय हे दोन घटकांवर अवलंबून असते. एक म्हणजे समाज आणि काही पराधीन गोष्टी. दुसरा घटक म्हणजे आपण स्वतः ! प्रथम वृद्धजीवन सुखी करणार्या पहिल्या घटकाचा विचार करू.
१. स्वातंत्र्य
माणूस जीवनभर या ना त्या दायित्वात अडकलेला असतो. बालपणी विद्याभ्यासाचे जोखड, तर तारुण्यात आणि प्रौढत्वात संसारचक्राचे फेरे. सेवानिवृत्त झाल्यावर अथवा वयाची साठी उलटल्यावर, अशा व्यक्तीला ‘सुटलो आता, झालो एकदाचे मोकळे. मुले आणि मुली आता आपल्या घरी सुखात आहेत. आता बस्स, मन मानेल तसे वागण्यास मुभा’, असे वाटणे साहजिकच आहे. वयस्क व्यक्तीला वाटते, ‘आता कौटुंबिक दायित्व फारसे नको. याविषयी कुटुंबातील व्यक्तींनी आपणाकडून अधिक अपेक्षा करू नयेत. आपण आपल्या आवडीच्या धकाधकीच्या जीवनात करायला सवड सापडू न शकलेल्या गोष्टी कराव्या. स्वतंत्र जीवन जगावे. समवयस्क मित्र आणि परिचित यांमध्ये यथेष्ट रमावे अन् गप्पा झोडाव्या. नव्या पिढीच्या संसाराचे दायित्व आपल्यावर नसावे.’
वृद्धांचे असे वाटणे, नव्या पिढीने सहानुभूतीपूर्ण सामंजस्याने समजावून घेतले पाहिजे. आई-वडिलांना संसाराला पुन्हा जुंपून आपले जीवन अधिक चांगले करण्याच्या एकांगी विचारांना बळी पडणे श्रेयस्कर नाही. पुष्कळ वृद्धांचे जीवन अपेक्षांच्या झगड्यांमुळे दु:खी झालेले आढळते. वृद्ध जीवन सुखी संपन्न होण्यास स्वातंत्र्य हा एक महत्त्वाचा घटक आहे. अर्थात् तो पराधीन आहे.
२. कार्यशक्तीला संधी
‘वय झाले’, म्हणजे माणसाच्या सार्या मानस आणि शरीर क्षमता नष्ट झाल्या, असे नव्हे. शरीर थकते हे खरे; पण मन अनुभवाने, वाचनाने समृद्ध होते. ‘जीवनभर कष्टाने मिळवलेल्या ज्ञानाचा, कौशल्याचा आणि माहितीचा उपयोग कुणाला तरी व्हावा’, असे वृद्धाला वाटत असते. आपली प्रमाणपत्रे रद्दीत पडावीत, याचे त्याला दुःख होते. काहीतरी आवडीचे, उपयोगी आणि चांगले काम करावे, असे निरोगी मनाच्या ज्येष्ठाला वाटते. कामाइतके समाज संपर्काचे दुसरे उत्तम माध्यम नाही. ‘कमावतो तो सामावतो’ अशी एक जुनी म्हण आहे. काम करण्याने स्व-संस्थापन होते. मुंबईसारख्या शहरात समुद्र हटवून भूमी मिळवली आहे. या प्रकाराला ‘पुनर्संपादन’ (Reclaimation) म्हणतात. तशीच वृद्धांची शक्तीही संघटित करून ती समाजाने उपयोगात आणली पाहिजे. अशाने समाज जीवनाची भूमी विस्तारित होईल. आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा समाजसेवी संस्थांनी वृद्धांना सेवा करण्याची संधी द्यावी. संस्थांना मदतनीस मिळतील, वृद्धांना काम करण्याचे समाधान मिळेल. एखादी वृद्ध-सेवा संयोजन संस्था निघाली पाहिजे. ‘गंजून जाण्यापेक्षा वापरून जाणे चांगले ! (It is better to wear out than to rust out.)’
३. सोयी-सवलती
सोयी-सवलती मिळाव्यात; म्हणून ज्येष्ठ मंडळी संप, मोर्चे, उपवास आणि धरणे असे मार्ग काही अवलंबणार नाहीत. शासनकर्त्यांनी समंजसपणे आपणहून वृद्धांना आवश्यक त्या सोयी-सवलती दिल्या पाहिजेत. ‘वृद्धांना आर्थिक साहाय्य करावे’, असे आपल्या भारतीय राज्यघटनेने म्हटले आहे. काही राज्ये वृद्धांना सामाजिक साहाय्य देतात. रेल्वेने प्रवास भाड्यात वृद्धांना थोडी सवलत सध्या ठेवलेली आहे. अशाच आणखी काही सोयी सवलती ज्या ज्येष्ठांना मिळायला हव्यात, त्या अशा :
अ. बालकांसाठी जशी वेगळी पुस्तके असतात, तशी ज्येष्ठांसाठीही असावीत. अशी पुस्तके, पांढर्या शुभ्र कागदावर, मोहोरेदार अक्षरांमध्ये छापलेली असावीत आणि ती वृद्धांना सवलतीच्या दरात मिळावीत.
आ. प्रवासी वाहनात अग्रहक्काने प्रवेश, सार्वजनिक उद्यानांत राखीव जागा इत्यादी. डोळे, कान आणि पाय अशक्त असल्यामुळे अशा सोयी आवश्यक वाटतात.
शासन आणि समाज वृद्धांविषयी आदर बाळगतील, तर हे सारे शक्य होईल. वृद्धांचा प्रतिनिधी लोक-दरबारी जाऊन त्यांची बाजू मांडेल तो भाग्याचा दिवस केव्हा उगवेल कोण जाणे ?
४. वृद्धांनी काय करावे ?
आता या लेखाच्या उत्तरार्धात, आपले उर्वरित आयुष्य सुखी समाधानी कसे होईल, यासाठी वृद्धांनी स्वतः काय केले पाहिजे आणि कसे वागले पाहिजे, हा विचार जाणून घेऊया.
अ. आपण किती म्हातारे ? तर आपणास वाटते तितके. वृद्धत्वाचे आवरण गुंडाळून स्वतःला म्हातारे मानण्याने जीवनातील अर्धा-अधिक उत्साह मावळून जातो. प्रत्येक वयस्कर व्यक्तीने स्वतःच्या शरिराच्या आणि मनाच्या स्थितीची योग्य संकल्पना आपल्या मनःचक्षुसमोर ठेवावी. हे मोजमाप चुकले, तर जग एकीकडे आणि आपण दुसरीकडे, असे होते. दुसर्यांच्या डोळ्यांला आपण कसे दिसतो, हे ओळखणारा खरोखर भाग्यवान म्हटला पाहिजे. ‘Nothing Too much’ (फार काही नको) हा संतुलन मंत्र श्रेयस्कर. तोंडवळ्यावरील सुहास्यासारखे दुसरे सामाजिक चलन नाही. आपले जीवन सुखी आणि संपन्न व्हावे, असे वाटणार्या वृद्धाने समाजात मिसळले पाहिजे. माणसाचे जीवनक्षेत्र (Life-Space) किती विशाल ? तर त्याचा किती लोकांशी परिचय आहे तितके.
आ. ‘वेळ जात नाही, काय करावे ?’, असा विचार दळभद्रीपणाचे लक्षण आहे. जीवनात योजनाबद्धता नसल्याचे गमक आहे. काही छंद, काही समाजसेवा, शरीर आरोग्यासाठी मोकळ्या हवेत फिरायला जाणे इत्यादी उपक्रम वृद्धासमोर असतील, तर त्याचे जीवन निश्चितपणे चैतन्यपूर्ण होईल. वेळ खायला उठणार नाही.
इ. स्वतःचे काम शक्यतो स्वत: करणे, कुटुंबियांना साहाय्य करणे, आवडीची समाजसेवा करणे, खेळ, छंद यांत मन रमवणे, वर्तनात संयम बाळगणे (विशेषत: जिभेचा बोलण्याचा आणि खाण्याविषयीचा संयम) या स्वरूपाच्या मार्गांनी वृद्ध जीवन सुखी आणि संपन्न होईल.
ई. काहींच्या मते आपल्या मानसिकतेला (Mental make up) अध्यात्माचे अधिष्ठान असावे. हा विषय वैयक्तिक श्रद्धेचा आहे. आध्यात्मिकता मनाचे आरोग्य टिकवण्यास हातभार लावते.
थोडक्यात ‘‘The old should add life to years and not years to life’ (वृद्धांनी आयुष्यात वर्ष नव्हे, तर वर्षांमध्ये जीवन जोडले पाहिजे) वृद्धांनी स्वतःचे जीवन चैतन्यमय करण्यातच त्यांचे हित आहे.’
– प्रा. राजाराम आफळे, वाई
(साभार : ‘जीवन-विकास’, जुलै १९९३)