चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’वरील विमानसेवेचे आरक्षण चालू
९ ऑक्टोबरला पहिले विमान येणार
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’वर ९ ऑक्टोबरला पहिले प्रवासी वाहतूक करणारे विमान उतरणार आहे. या विमानासाठीचे आरक्षण गुरुवार, २३ सप्टेंबरपासून एअर इंडियाच्या www.airIndia.in या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) चालू करण्यात आले आहे. त्यासाठी प्रवाशांनी SDW हा आरक्षण संकेतांक (‘बूकिंग कोड’) नोंद करावा, अशी माहिती विमानतळाचे व्यवस्थापक समीर कुलकर्णी यांनी दिली.
व्यवस्थापक कुलकर्णी यांनी सांगितले की, ९ ऑक्टोबरपासून प्रतिदिन येथून विमानसेवा चालू होणार आहे. प्रतिदिन सकाळी ११.३५ वाजता मुंबई येथून विमान सुटून ते दुपारी १ वाजेपर्यंत सिंधुदुर्ग विमानतळावर येणार आहे, तर परतीच्या प्रवासासाठी विमान दुपारी १.२५ वाजता सुटून २.५० वाजेपर्यंत मुंबईत पोचणार आहे. या विमानाची आसन क्षमता ७० आहे.