कष्टाळू, कार्यकुशल आणि चांगला लोकसंग्रह असलेले हिंदु जनजागृती समितीचे ‘वक्ता-प्रवक्ता’ म्हणून सेवा करणारे देहली सेवाकेंद्रातील श्री. नरेंद्र सुर्वे (वय ४४ वर्षे) !
आज भाद्रपद कृष्ण पक्ष तृतीया (२४.९.२०२१) या दिवशी श्री. नरेंद्र सुर्वे यांचा ४४ वा वाढदिवस आहे. ते मूळचे कोकरेगाव (तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) येथील असून सध्या देहली येथील सनातनच्या सेवाकेंद्रात राहून सेवा करत आहेत. ते हिंदु जनजागृती समितीचे ‘वक्ता-प्रवक्ता’ म्हणून सेवा करतात. त्यांची पत्नी सौ. नंदिनी सुर्वे यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.
श्री. नरेंद्र सुर्वे यांना ४४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. वडिलांचे निधन झाल्यावर आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लहानपणापासूनच श्री. नरेंद्र यांना कामे करावी लागणे आणि नंतर आस्थापनात काम करतांना त्यांचा हात यंत्रात अडकून अपघात होणे
‘यजमानांच्या लहानपणी त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. ते बाराव्या इयत्तेत शिकत असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांची आई कपड्यांच्या दुकानात कामाला होती. घरातील ‘मोठा मुलगा’ या नात्याने त्यांनी शाळेत असल्यापासूनच वृत्तपत्रांचे वितरण करणे, वह्यांची विक्री करणे इत्यादी कामे केली. बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर ते एका आस्थापनात कामाला जाऊ लागले. कामाला लागल्यानंतर २ दिवसांतच त्यांचा हात यंत्रामध्ये अडकून अपघात झाला.
२. साधनेची तळमळ
२ अ. ‘साधना करता यावी’, यासाठी श्री. नरेंद्र यांनी एकाच पदावर १० वर्षे काम करणे आणि कामावरून आल्यावर रात्री सेवा अन् अभ्यास करणे : श्री. नरेंद्र यांनी वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. साधनेत आल्यानंतर गुरुकृपेने त्यांना लगेचच एका नामांकित आस्थापनात नोकरी लागली. त्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. ते बेंगळूरू येथील एका आस्थापनात महाराष्ट्राचे ‘झोनल मॅनेजर’ या पदावर काम करत होते. तेथे त्यांना पदोन्नती मिळून ते पुष्कळ पैसा मिळवू शकले असते; पण ‘साधना करता यावी’, यासाठी ते एकाच पदावर १० वर्षे काम करत राहिले. ते रात्री कामावरून आल्यावर सेवा करायचे. हिंदु जनजागृती समितीचे ‘वक्ता-प्रवक्ता’ म्हणून सेवा करण्यासाठी त्यांना सतत अभ्यास करावा लागतो. आस्थापनातून रात्री घरी आल्यावर ते अभ्यास करायचे.
२ आ. श्री. नरेंद्र यांनी नोकरी सोडल्यावर वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांना वेतनवाढीचे प्रलोभन दाखवणे; पण यजमान पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयावर ठाम रहाणे : यजमान त्यांच्या कार्यालयीन कामात निपुण होते. त्यांचे वरिष्ठ अधिकारीही त्यांचा सल्ला घेत असत. त्यांनी वर्ष २०१९ मध्ये नोकरी सोडली आणि आम्ही दोघांनी पूर्णवेळ साधना करायला आरंभ केला. एकदा त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटायला घरी आले आणि यजमानांना म्हणाले, ‘‘पहा, तुम्ही एका वर्षात पुन्हा आमच्या आस्थापनात याल. आम्ही तुमची वाट पाहू.’’ ते श्री. नरेंद्र यांच्या वेतनातही वाढ करणार होते. ‘आम्ही गोवा येथे रहायला जायचे ठरवले आहे’, हे कळल्यावर ‘श्री. नरेंद्र यांनी गोव्यात तरी नोकरी करावी’, अशी त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांची अपेक्षा होती; पण गुरुकृपेने यजमान पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयावर ठाम राहिले.
३. उत्तम बौद्धिक क्षमता आणि कार्यकुशलता
यजमानांची बौद्धिक क्षमता पुष्कळ चांगली आहे. ते एकाच वेळी अनेक कामे सहजतेने करतात. ‘वेगवेगळ्या ठिकाणच्या स्थानिक आणि भौगोलिक परिस्थितीचा अचूक अभ्यास करणे अन् तेथील लोकांना आपल्या वाक्चातुर्याने जोडणे’, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. समष्टी सेवेत या गुणाचा त्यांना पुष्कळ लाभ झाला.
४. जवळीक साधणे
यजमान पूर्वी काम करत असलेल्या आस्थापनातील वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर आणि त्यांचे सहकारी यांच्याशी आजही त्यांची चांगली जवळीक आहे. त्यांचा लोकसंग्रह पुष्कळ चांगला असून त्यांनी अनेक लोकांना जोडून ठेवले आहे.
५. कौटुंबिक कर्तव्ये निभावणे आणि पत्नीला साधनेत साहाय्य करणे
श्री. नरेंद्र यांचा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे साधना करतांना त्यांचे कुटुंबाकडेही तेवढेच लक्ष असते. आमच्या जीवनात अनेक प्रसंग घडले; पण त्यांनी सदैव मला साथ दिली. आमचे लग्न झाल्यापासून आमच्यात कधीच वादविवाद झाले नाहीत. त्यांनी मला साधनेत सर्वतोपरी साहाय्य केले आणि आताही करत आहेत.
६. पूर्णवेळ साधना करायला आरंभ केल्यानंतर श्री. नरेंद्र यांच्यात जाणवलेले पालट
अ. यजमानांचा तोंडवळा उजळला आहे.
आ. त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलतांना ‘त्यांच्या मनातील काळजीचे विचार आता न्यून झाले आहेत आणि सर्वकाही गुरूंवर सोपवून ते सेवा करत आहेत’, असे जाणवते. त्यांची गुरूंप्रतीची श्रद्धा वृद्धींगत झाली आहे.
इ. पूर्वी त्यांना सेवाकेंद्रातील काही सेवा करावी लागल्यावर त्यांच्या मनाचा संघर्ष व्हायचा; पण आता त्यांच्यातील स्वीकारण्याची वृत्ती वाढली आहे.
ई. त्यांच्या बोलण्यात सहजता जाणवते.
उ. सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळेकाका यांच्या मार्गदर्शनामुळे श्री. नरेंद्र यांच्यात पालट होत आहेत. साधकांनाही त्यांच्यातील पालट जाणवत आहेत.
७. अनुभूती
७ अ. लग्नाअगोदर ज्योतिषांनी ‘मूल-बाळ होणार नाही’, असे सांगितलेले असणे; पण परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने चि. कृष्णचा जन्म होणे : लग्नाअगोदर आमच्या दोघांची पत्रिका पाहून एका ज्योतिषाने सांगितले होते, ‘‘तुम्हाला मूल-बाळ होणार नाही.’’ असे असतांनाही ‘साधना करता यावी; म्हणून आम्ही दोघांनी लग्न केले आणि गुरुकृपेने चि. कृष्णचा जन्म झाला. ही आमच्यासाठी सर्वांत मोठी अनुभूती आहे.
७ आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने सासूबाईंच्या दोन्ही डोळ्यांच्या काचबिंदूचे शस्त्रकर्म अल्प व्ययात होणे : यजमानांचे त्यांच्या आईवर पुष्कळ प्रेम आहे. आईंच्या (सासूबाईंच्या) दोन्ही डोळ्यांच्या काचबिंदूचे शस्त्रकर्म करायचे होते. त्यासाठी बराच खर्च येणार होता; पण गुरुकृपेने आमच्याकडे होते, तेवढ्या पैशांतच हे शस्त्रकर्म झाले. एरवी असे शस्त्रकर्म करायला सहस्रो रुपये लागतात; पण अल्प व्ययात हे शस्त्रकर्म झाले. हे सर्व आमच्यासाठी कल्पनातीत होते. श्री गुरूंच्या चरणी ‘कोटीशः कृतज्ञता’ एवढेच मी म्हणू शकते.
कृतज्ञता आणि प्रार्थना
आम्हा उभयतांचा आतापर्यंतचा जीवनप्रवास गुरुकृपेनेच पार पडला आहे. माझे पती श्री. नरेंद्र यांच्यामुळे मी गुरुचरणांची सेवा करू शकत आहे. याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करते. ‘श्री. नरेंद्र यांची लवकरात लवकर प्रगती होऊन त्यांची जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्तता व्हावी’, अशी मी गुरुचरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’
– सौ. नंदिनी सुर्वे (पत्नी), ढवळी, फोंडा, गोवा. (२८.८.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |