‘उस्मानाबाद’ जिल्ह्याचे मूळ ‘धाराशिव’ हे नाव पूर्ववत् करावे, या मागणीसाठी हिंदूराष्ट्र सेनेचे लाक्षणिक धरणे आंदोलन !
धाराशिव, २३ सप्टेंबर (वार्ता.) – ‘उस्मानाबाद’ जिल्ह्याचे ‘धाराशिव’ हे मूळ नाव पुन्हा पूर्ववत् करावे, या मागणीसाठी हिंदूराष्ट्र सेना आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. या आंदोलनास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, नाभिक संघ या संघटनांचा सहभाग होता. या वेळी महंत मावजीनाथ महाराज, महंत व्यकंटअरण्य महाराज, विक्रम साळुंके, संजय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.
याविषयीच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘धाराशिव’ हे शहराचे प्राचीन नाव आहे. निजाम राजवटीमध्ये उस्मानअली या निजामाच्या नावावरून ‘धाराशिव’चे ‘उस्मानाबाद’, असे नामांतर करण्यात आले होते. उत्तरप्रदेश सरकारने यापूर्वीच अनेक शहरांची नावे पूर्ववत् केली आहेत. धाराशिव येथील ग्रामदैवत श्री धारासुर मर्दिनीदेवीच्या नावावरून पडलेले ‘धाराशिव’ हे शहराचे मूळ नाव पुन्हा पूर्ववत् करण्यात यावे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात यायला हवे ! – संपादक)