गुरांची अवैधपणे होणारी हत्या आणि ‘धिरयो’ रोखण्यासंबंधी मडगाव येथे दक्षिण गोव्यातील पोलीस अधिकार्यांना मार्गदर्शन !
मडगाव, २३ सप्टेंबर (वार्ता.) – अवैधरित्या करण्यात येणारी गुरांची हत्या आणि आयोजित केल्या जाणार्या धिरयो (बैलांच्या किंवा रेड्यांच्या झुंजी) यातून मुक्या प्राण्यांना सहन करावे लागणारे हाल रोखण्यासंदर्भात पशूसंवर्धन खात्याने दक्षिण गोव्यातील पोलीस अधिकार्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात एक सत्र आयोजित केले होते. या सत्रात दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका कटयाल, पशूसंवर्धन खात्याचे अधिकारी डॉ. प्रशांत नाईक आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यासंदर्भात माहिती देताना पशूसंवर्धन खात्याचे दक्षिण गोवा जिल्हा प्रमुख डॉ. प्रशांत नाईक म्हणाले, ‘‘नियम न पाळता अवैधपणे होणार्या गुरांच्या हत्येमुळे या मुक्या प्राण्यांना क्रूरपणे कापले जाते आणि त्यांना भयंकर हाल सहन करावे लागतात. अशा प्रकारच्या हत्या रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याचे अधिकार पोलिसांकडे आहेत. पोलीस पशूसंवर्धन खात्याच्या अधिकार्यांच्या साहाय्याने या हत्या रोखू शकतात. ‘धिरयो’मध्ये जुंपले जाणारे रेडे किंवा बैल यांनाही क्रूरपणे एकमेकांमध्ये झुंजण्यासाठी प्रवृत्त केले जाते. या प्रक्रियेत त्यांचे बरेच हाल होतात. हे हाल लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने ‘धिरयो’ रोखण्यावर भर देणे आवश्यक आहे. अवैधपणे भरवल्या जाणार्या झुंजी पहाणार्यांनीही मुक्या प्राण्यांचे हाल होतात हे लक्षात घेऊन ते पहाण्यास गर्दी करणे टाळावे. नैसर्गिकरित्या होणार्या बैल किंवा रेडे यांच्या झुंजी वेगळ्या असतात आणि बळजोरीने आयोजित केल्या जाणार्या बैल आणि रेडे यांच्यामधील झुंजी वेगळ्या असतात.’’
‘धिरयो’ प्रकरणी ४६ गुन्हे नोंद आणि आतापर्यंत ८८ जणांना अटक
मडगाव – राज्यात प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्राणी कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले आहे, तसेच धिरयो आयोजित करणार्यांवर कारवाई करण्यासाठी राज्याच्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ‘सोसायटी ऑफ प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स’ या संस्थेच्या सूचनेनुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलीस विशेष विभाग कार्यरत करण्यात आले आहेत. वर्ष २०१८ ते ७ सप्टेंबर २०२१ पर्यंत धिरयोचे आयोजन केल्याच्या प्रकरणी ४६ गुन्हे नोंद करून ८८ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पशूसंवर्धन आणि पशूचिकित्सा विभागाचे संचालक डॉ. आगोस्तिन्हो आंतोनियो मिस्किता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात प्रतिज्ञापत्र सादर करून दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑक्टोबर २०२१ या दिवशी होणार आहे.
पिपल फॉर ॲनिमल या अशासकीय संस्थेने खंडपिठात वर्ष १९९६ मध्ये याचिका प्रविष्ट करून धिरयोविषयीचे सूत्र मांडले होते. त्यानंतर २० डिसेंबर १९९६ या दिवशी खंडपिठाने धिरयोवर बंदी आणण्याचा निवाडा दिला होता. याला संबंधितांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले आव्हान फेटाळण्यात आले होते. गोवा पोलिसांनी राज्यात वर्ष २०१८ ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले धिरयोचे ३३ कार्यक्रम उधळून लावले, तसेच बैलांच्या मालकांना फौजदारी दंड संहितेच्या कलम १४९ अंतर्गत ४१५ नोटिसा बजावून कारवाई करण्यात आली. दोन्ही जिल्ह्यांत पोलीस उपअधीक्षकांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला विशेष विभाग स्थापन करून कारवाई करण्याचे दायित्व देण्यात आले असल्याची माहिती या प्रतिज्ञापत्रात सादर करण्यात आली आहे.