आमच्या किडन्या विका; पण शहरातील रस्ते तात्काळ दुरुस्त करा !
जळगाव येथील नागरिकांची महापालिका प्रशासनाकडे विनंती !
जळगाव – शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिक त्रस्त आहेत. वेळोवेळी रस्ते दुरुस्तीची मागणी करूनही लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामळे संतप्त नागरिकांनी २१ सप्टेंबर या दिवशी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. या वेळी ‘आमच्या किडन्या विका; पण शहरातील रस्ते दुरुस्त करा’, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकडे केली. (शहरातील नागरिकांना प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, हे महापालिकेचे दायित्व असतांना सर्वसामान्य नागरिकांनी हतबल होऊन ‘किडन्या विकून रस्त्यांची दुरुस्ती करा’, असे म्हणणे महापालिका प्रशासनासाठी लज्जास्पद आहे. असे म्हणण्याची वेळ पुन्हा जनतेवर येणार नाही, यासाठी महापालिकेने गांभीर्याने कृती करावी ! – संपादक) सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ‘न्यायालयाच्या आदेशानंतर तरी रस्ते सुरळीत होतील’, असे वाटत असल्याने काही सुजाण नागरिकांनी या प्रकरणी न्यायालयात जाण्याचीही सिद्धता केली आहे.