गुरुदेवांविषयी कृतज्ञताभाव आणि प्रेमभाव असलेल्या मडिकेरी (मैसुरू, कर्नाटक) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. आशा बालकृष्ण (वय ५२ वर्षे) !
१. कार्यपद्धतीचे पालन करणे
‘सौ. आशाअक्कांना ‘कार्यपद्धतीप्रमाणे सेवा झाली पाहिजे’, असे सांगितल्यास त्या कार्यपद्धतीचे पालन करतात आणि सहसाधकांकडून त्याप्रमाणे करवून घेतात. तसे झाले नाही, तर ते होईपर्यंत त्या पाठपुरावा करतात. ‘कार्यपद्धतीचे पालन करणे’, ही माझी साधना आहे’, असा त्यांच्या मनात भाव असतो आणि त्यानुसार त्या कृती करतात.
२. परिपूर्ण सेवा करणे
अक्कांना कोणतीही सेवा दिली, तरी त्या ती सेवा पूर्ण करतात. त्यांच्यासाठी सेवा नवीन असो अथवा आधी केलेली असो, त्या ती सेवा समान भावाने करतात. मी प्रथमच मैसुरू येथे हिंदुत्वनिष्ठांसाठी कार्यशाळा घेतली. तेव्हा त्यांनी निवासव्यवस्थेची सेवा केली. ती सेवा सर्वांसाठी नवीन होती; परंतु अक्कांनी सेवेची पूर्ण व्याप्ती समजून घेऊन ती अचूक आणि परिपूर्ण केली.
३. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
अक्का प्रतिदिन व्यष्टी साधना पूर्ण करून साधनेचा आढावा दिल्याविना झोपत नाहीत. रात्री कितीही उशीर झाला, तरी त्या व्यष्टी साधनेचे प्रयत्न पूर्ण करूनच झोपतात. त्या काही वेळा मडिकेरी येथून मैसुरूला सत्संगासाठी येतात. त्या वेळी त्यांचा साधारण ३ ते ३.३० घंटे प्रवास होतो, तरी परत आल्यावर त्या लगेच नामजपादी उपाय करतात. अत्तर-कापूराचे उपाय करणे, स्वयंसूचना सत्रे करणे इत्यादी त्या तत्परतेने आणि सातत्याने करतात.
अक्का आपल्या व्यष्टी साधनेचा आणि सेवेचा आढावा न चुकता नियमितपणे देतात. त्यांच्या आढाव्याविषयी आम्हाला पाठपुरावा करावा लागत नाही. अक्का स्वतःकडून झालेल्या चुका समष्टीत सांगतात आणि व्यष्टी आढावाही नियमितपणे देतात. त्या त्यात एक दिवसही सवलत घेत नाहीत.
४. प्रेमभाव
अक्का मडिकेरीला रहातात; परंतु त्या कुशालनगर येथे सेवा करतात. त्या कुशालनगर येथे साधक सेवेसाठी गेल्यास साधकांचे जेवण, जाणे-येणे, यांविषयी त्या दूरभाष करून विचारतात आणि ‘काही अडचण आली नाही ना ?’, असे विचारून काळजीही घेतात.
५. परात्पर गुरुदेवांविषयीचा कृतज्ञताभाव
त्यांना परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्याविषयी काही सांगितले, तरी त्यांचा भाव जागृत होऊन त्यांना बोलता येत नाही. मी त्यांना ‘तुम्ही आता व्यष्टी साधनेचे प्रयत्न कसे करत आहात ?’, असे विचारले. त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेने माझ्या अनेक स्वभावदोषांचे निर्मूलन झाले आहे. आधी मला माझी मुलगी, त्यांची मुले यांविषयी पुष्कळ ओढ होती; परंतु गुरुदेवांच्या कृपेने ती पुष्कळ न्यून झाली आहे. आता मला सेवेला वेळ देणे शक्य होते.’’ हे त्या अत्यंत कृतज्ञताभावाने सांगत होत्या. त्या वेळी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत होते.’
– कु. रेवती मोगेर, मैसुरू, कर्नाटक. (डिसेंबर २०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |