पुणे येथे दोन घटनांत वाहतूक पोलिसांना मारहाण
पोलिसांनाच मारहाण होणे, हे कुणालाही कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचे लक्षण आहे. हे टाळण्यासाठी गुन्हेगारांना कठोर शिक्षा तात्काळ करणे आवश्यक आहे. – संपादक
पुणे – विश्रांतवाडी चौकात रिक्शाचालक बाबुशा किर्तीवार यांच्याकडे रिक्शाची कागदपत्रे मागितल्याने त्यांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत हुज्जत घालून लोखंडी रॉडने मारहाण केली, तसेच भ्रमणभाषची हानी करून रिक्शा जोरात चालवून पळ काढला. अनिल मन्हाळकर यांनी याविषयी तक्रार नोंदवली असून ते येरवडा वाहतूक विभागात कार्यरत आहेत. साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दुसर्या घटनेत एरंडवणे कोथरूड येथील ‘मंत्री उद्याना’जवळ ‘सिग्नल’ मोडणार्या वाहनचालकास थांबवल्याने त्याने वाहतूक पोलिसाला दगडाने मारहाण करून दंडाला चावा घेतला. वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार परमेश्वर पाडळे यांनी या प्रकरणी मंगेश काळे यांच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून काळे यांना डेक्कन पोलिसांनी कह्यात घेतले आहे. काळे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.