गोव्यातील शैक्षणिक संस्थांजवळ होत आहे तंबाखू उत्पादनांची विक्री !
पणजी – गोवा राज्यातील ९७ शैक्षणिक संस्थांपासून १०० मीटर अंतराच्या आत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असून ती धोकादायक असल्याचे दोनापावला येथे नुकत्याच झालेल्या कार्यशाळेत सांगण्यात आले. ‘बीग टोबॅको टिनी टार्गेट’ या सर्वेक्षणामध्ये ही गोष्ट उघड झाली आहे. हे सर्वेक्षण ‘व्हाईस’ या संस्थेने केले आहे.
देहली येथील ‘व्हाईस’ या तंबाखू नियंत्रण संस्थेच्या सहकार्याने दोनापावला येथील मणिपाल रुग्णालयात नुकत्याच आयोजित केलेल्या तंबाखू नियंत्रण कार्यशाळेत या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालाचे अनावरण करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन आरोग्य खात्याचे सचिव रवि धवन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगरविकास खात्याचे सचिव तारीक थॉमस, तंबाखू नियंत्रण संघटनेचे (‘नोट’चे) भारतातील अध्यक्ष डॉ. शेखर साळकर, ‘व्हाईस’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्मी सानियाल आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य खात्याचे सचिव रवि धवन म्हणाले, ‘‘मुलांनी तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करू नये, याविषयी सरकार सतर्क आहे, तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी आवश्यक ती पावले सरकार उचलत आहे.’’ (असे आहे तर राज्यातील ९७ शैक्षणिक संस्थांपासून १०० मीटर अंतराच्या आत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री कशी होते ? – संपादक)
तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणारे गंभीर आजार लक्षात घेता, त्यावर कडक नियंत्रण आवश्यक आहे, असे तारीक थॉमस म्हणाले. ई-सिगारेट ही सध्याच्या आधुनिक युगात युवकांसाठी आकर्षण करणारी वस्तू ठरली असून त्यावरही नियंत्रण आवश्यक असल्याचे डॉ. साळकर म्हणाले.