करूणा शर्मा यांना १६ दिवसांनंतर जामीन संमत !
बीड – सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभाग मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळी येथे आलेल्या करूणा शर्मा (धनंजय मुंडे यांच्या दुसर्या पत्नी) यांना अंबेजोगाईच्या सत्र न्यायालयाने जामीन संमत केला. करूणा शर्मा यांना १६ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. करूणा शर्मा यांनी परळी येथे येण्यापूर्वी धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्या ५ सप्टेंबर या दिवशी परळी येथे आल्या असता त्यांना रोखण्यासाठी शहरात धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. ६ सप्टेंबर या दिवशी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.