गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी राज्यात २० जणांचा पाण्यात बुडून मृत्यू !
मुंबई – गणेशोत्सव विसर्जनाला गालबोट लागले असून राज्यातील विविध घटनांमध्ये २० जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यात मुंबई येथे ३, पुणे २, नगर ३, अमरावती १, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे १, खानदेश ६, तर सोलापूर येथे ४ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
१. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील अरमान पठाण याचा बासलापूर तलावात बुडून मृत्यू झाला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे काका आणि इतर २ भाऊही गाळात फसले; पण गणेशमूर्ती विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी त्यांचे प्राण वाचवले.
२. कान्हेगाव (तालुका श्रीरामपूर, जिल्हा नगर) येथील शेततलावाच्या ठिकाणी खेळण्यासाठी गेलेली ३ मुले बुडून मरण पावली. २० सप्टेंबर या दिवशी सकाळी ते तिघे खेळण्यासाठी पाण्यात उतरले होते.
३. गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी मोशी (जिल्हा पुणे) येथील इंद्रायणी नदीपात्रात २ जणांचा बुडून मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात ४ बालके बुडून मृत झाली. धुळे येथे संतोष शिरसाठ-कोळी यांचा पाण्यात बुडून, तर नंदुरबार जिल्ह्यात एका युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.
४. चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी तितूर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या साहिल शाह शरीफ शाह फकीर आणि अयान शाह शरीफ शाह फकीर अशा दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला.
५. जामनेर तालुक्यातील जांभोळ येथे भाऊ रुद्र जोशी आणि त्याची बहीण मानवी जोशी ही दोन्ही लहान भावंडे घरी कुणीच नसल्याने शेजारी असलेल्या ‘केटिवेअर’मध्ये पोहण्यासाठी गेली होती; पण पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले.
६. शहादा तालुक्यातील करजई येथे तलावात पाय घसरून पडल्याने भिकेसिंग गिरासे यांचा मृत्यू झाला.