महिला सुरक्षेच्या प्रश्नी २ दिवसांचे अधिवेशन घ्यावे !
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश !
मुंबई – येथील साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना २ दिवसीय अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत. ‘या अधिवेशनात राज्यातील महिलांची सुरक्षा आणि कायदा अन् सुव्यवस्था यांच्या सूत्रांवर चर्चा करण्यात यावी’, असे राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला सांगितले आहे. यासंदर्भात राज्यपालांनी पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांना निर्देश दिले आहेत.
‘राज्यात अधिवेशन घेण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाकडून घेतला जातो; मात्र राज्यपालांनी निर्देश दिल्यानंतर हे आदेश राज्य सरकारवर बंधनकारक असतील का ? राज्य सरकार अधिवेशन घेण्याचा निर्णय घेईल का ?’, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
राज्यपालांना असे निर्देश देण्याचा नैतिक अधिकार नाही ! – शिवसेना
‘राज्यपालांना असे निर्देश देण्याचा नैतिक अधिकार नाही’, अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आली आहे.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत याविषयी म्हणाले, ‘राज्यपालांच्या या निर्देशांवर महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील; मात्र असे असेल, तर उत्तर प्रदेशात प्रतिदिन अधिवेशन घ्यावे लागेल. जर राज्यपालांना अधिकार आहेत, तर त्यांनी आधी विधान परिषदेतील १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांविषयी निर्णय घ्यावा.’’