धर्मप्रचाराची तळमळ, निरपेक्ष वृत्ती आणि परात्पर गुरु डॉक्टर अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या प्रती भाव असलेल्या सौ. आराधना चेतन गाडी !
१. धर्मप्रचाराची तळमळ
१ अ. सौ. आराधना यांच्या तळमळीमुळे समाजातील धर्मप्रेमी सनातनशी जोडले जाऊ लागणे आणि त्या वेळी परात्पर गुरु देशपांडेकाकांनी ‘तुम्ही दोघे मिळून धर्मप्रचार करा’, असे सांगणे : ‘आरंभी मी आणि माझी पत्नी सौ. आराधना दोघे मिळून धर्मप्रचाराच्या सेवेसाठी विविध गावांत जात होतो. तेव्हा सौ. आराधनाच्या तळमळीमुळे धर्मप्रेमी व्यक्ती सनातन संस्थेशी जोडल्या जात होत्या. त्या वेळी सनातनचे परात्पर गुरु कालिदास देशपांडेकाका सौ. आराधनाला म्हणाले होते, ‘‘तुम्ही दोघे मिळून प्रसार करा !’’ अशा प्रकारे आम्हाला त्यांचा आशीर्वादच मिळाला होता. सौ. आराधना नेहमी ही गोष्ट आठवून परात्पर गुरु देशपांडेकाकांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.
१ आ. साधक प्रसारसेवेत असतांना पत्नी सौ. आराधनाने ‘धर्मप्रेमींशी जवळीक साधण्याच्या दृष्टीने कसे प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयी सांगितलेली सूत्रे : मी प्रसारसेवेत असतांना सौ. आराधना मला भ्रमणभाष करायची. तेव्हा ती मला ‘प्रचार कसा चालला आहे ?’ असे विचारत असे. मी प्रचाराविषयी काही सांगितल्यावर तिला पुष्कळ आनंद होऊन गुरूंप्रती कृतज्ञता वाटायची. ती सांगायची, ‘‘आपण सर्वांना प्रेम द्यायला हवे. अधिकाधिक धर्मप्रेमींना जोडण्यासाठी तुम्ही त्यांच्या घरी जाऊन जवळीक वाढवा. त्यांना सत्सेवा द्या. त्यांना अधूनमधून आश्रमातील प्रसाद द्या. त्यांना रामनाथी आश्रमात घेऊन या. धर्मप्रेमींच्या कुटुंबियांशी जवळीक वाढवा. आंध्रप्रदेशामधील धर्मप्रेमींना ‘साधक’ बनवायचे आहे. तिथे पुष्कळ चांगला प्रतिसाद आहे. गुरुदेवांना शरण जाऊन स्वतःमध्ये प्रेमभाव वाढवा आणि तुम्ही साधनेचे चांगले प्रयत्न करा.’’ तिने ही सूत्रे सांगितल्यावर मलाही धर्मप्रचार सेवेसाठी प्रेरणा मिळत असे.
२. निरपेक्षता
सौ. आराधनाला माझ्याकडून कसलीच अपेक्षा नसते. ‘मी तिच्यासाठी काही करावे किंवा काही आणावे’, असे विचार तिच्या मनात कधीच नसतात. माझ्या आईकडून किंवा तिच्या माहेरच्या सदस्यांकडूनही तिला कोणत्याच अपेक्षा नसतात. ‘त्यांना त्रास होऊ नये, यासाठी मी काय करू ?’, असे तिला वाटते. ‘सर्वांनी साधनेत चांगली प्रगती करावी’, एवढाच विचार तिच्या मनात असतो.
३. सकारात्मक राहून आध्यात्मिक त्रासावर मात करणे
सौ. आराधनाला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. कधी कधी तिला तो त्रास सहन करता येत नाही, तरी ती सकारात्मक दृष्टीकोन ठेवून त्या स्थितीतून बाहेर पडते.
४. सौ. आराधना यांना आलेल्या अनुभूती
४ अ. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला जाणार्या साधकांमध्ये स्वतःचे नाव नसल्याने पत्नीला वाईट वाटणे, तिने प.पू. भक्तराज महाराज यांना आर्ततेने प्रार्थना करणे आणि ती प्रार्थना गुरुदेवांपर्यंत पोचल्याची प्रचीती म्हणून तिला गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला जाण्याचा निरोप मिळणे : सौ. आराधना रामनाथी आश्रमात असतांना गोव्यातील एके ठिकाणी सनातनच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाचा कार्यक्रम होता. तेव्हा आश्रमातील काही साधकांना त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यामध्ये आराधनाचे नाव नव्हते. त्यामुळे तिला वाईट वाटून ती ध्यानमंदिरात प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राजवळ जाऊन रडली आणि तिने त्यांना मनोमन प्रार्थना केली, ‘माझी साधना अत्यल्प आहे, यासाठी मला क्षमा करावी.’ त्या विचारामुळे रात्रभर तिला झोप लागली नाही. दुसर्या दिवशी सकाळी परात्पर गुरु डॉक्टरांनी एका साधकाकडून निरोप पाठवला, ‘‘सौ. आराधनाला गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला पाठवा.’’ गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाल्यावर गुरुदेवांनी त्या साधकाला ‘आराधना गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला गेली होती ना ?’, असे विचारले. काही दिवसांनी तिची गुरुदेवांशी भेट झाली. तेव्हा त्यांनी विचारले, ‘‘तू गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला जाऊन आलीस का ?’’ यावरून ‘साधकाची प्रार्थना ईश्वर नक्कीच ऐकतो’, असे माझ्या लक्षात आले.
४ आ. असह्य आध्यात्मिक त्रास होत असल्याने परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर एक-दोन दिवसांतच अकस्मात् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ साधिकेच्या घरी येणे : गुरुदेवांचे स्मरण करताच सौ. आराधनाच्या डोळ्यांत भावाश्रू येतात. जेव्हा आध्यात्मिक त्रास सहन न होऊन तिच्या मनात संघर्ष होत असे, तेव्हा ती गुरुदेवांना प्रार्थना करायची आणि एक-दोन दिवसांत अगदी अकस्मात् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आमच्या घरी यायच्या. त्या आणि साधक आमच्या घरी आले की, आराधनाला पुष्कळ आनंद होत असे. ‘साक्षात् श्री लक्ष्मीदेवीच्या रूपाने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे घरात आगमन होत आहे’, याची अनुभूती तिने अनेक वेळा घेतली आहे.
कृतज्ञता
‘सौ. आराधनासारखी साधिका मला पत्नीच्या रूपात लाभली, यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘मला तिच्याकडून सदैव शिकता येऊन शिकण्याच्या स्थितीतच रहाता येऊ दे’, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करतो.’
– गुरुसेवक,
श्री. चेतन जनार्दन गाडी (सौ. आराधना यांचे पती), भाग्यनगर (हैद्राबाद) (जुलै २०१८)
|